विशेष प्रतिनिधी
अमरावती : अमरावतीचे माझ्यावर कर्ज आहे. माझी आई अमरावतीची आहे, त्यामुळे अमरावतीशी माझं वेगळं नातं आहे. अमरावतीत काही चांगलं झालं तर सर्वाधिक आनंद माझ्या आईला होतो. त्यामुळे आईला आनंद देणं माझ्या आनंदाचे एक कारण असते असा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. ( The Chief Minister said that he has a connection with Amravati.)
अमरावती विमानतळाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, अमरावती विमानतळाचे 2019 साली काम सुरू केलं होतं. मोदींच्या सरकारमध्ये प्रयत्न करून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने काम हाती घेतलं. धावपट्टीचे विस्तारीकरण केलं, नवनीत राणा सोबत होत्या. त्यानंतर काही कारणाने बंद पडलं होतं. केंद्र सरकारशी संबंधित काम सुरू होतं. राज्य सरकारशी संबंधित काम संथगतीने होतं. पण शिंदे सरकार आल्यानंतर वेगाने काम सुरू झाले.
केंद्र सरकारने एअरपोर्टला पहिलं विमान दिलं. या विमानात बसून आम्ही आलो. या ठिकाणी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे. एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे अमरावती जगाच्या नकाशावर येणार आहे, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, साऊथ ईस्ट अशियामधील सर्वात मोठं स्कूल असणार आहे. दरवर्षी 180 पायलट अमरावतीतून तयार होतील, जवळपास 34 विमाने पार्क असतील. ही विमाने ट्रेनिंग देतील. पायलट ट्रेनिंग स्कूल आल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. रोजगार वाढेल. मोदी सरकारच्या कार्यकाळात मिळालेली मोठी भेट आहे. अमरावती एक शहर म्हणून ओळखलं जाणार नाही. तर जगाच्या पाठीवर सर्वात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल कुठे आहे, तर आपल्या अमरावतीत आहे, अशा प्रकारची अमरावतीला ओळख मिळणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले,मोदींना सात टेक्स्टाईल पार्क तयार करायचा ठरवलं होतं. त्यातील एक पार्क अमरावतीला देण्याचं मोदींनी मान्य केलं. आता तो सुरू होतोय, 2 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
