विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिक येथील ‘निर्धार मेळावा’ हा शिवसेना (ठाकरे गट) साठी प्रचाराचे सोयीस्कर व्यासपीठ ठरले. मात्र, या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य म्हणजे स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न असल्याची टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. हिंदुत्वाच्या नावाने भाजपवर टीका करताना, उद्धव ठाकरेंनी आपली जुनी भूमिका विसरल्याचे चित्र या भाषणातून दिसून आलं. ( Politics of confusion in the name of Hindutva Misleading and doubleedged stance in Uddhav Thackerays statement)
सत्ता गेल्यानंतर बाळासाहेबांचा आवाज वापरणं, हिंदुत्वाची पुन्हा व्याख्या मांडणं, आणि विरोधकांवर आरोप करत स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी झटकणं — हा संपूर्ण प्रकार म्हणजे “न मिळालेल्या सत्तेचा राग, आणि जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न” आहे, असं मत विरोधी गटातून व्यक्त होत आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मी भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही.” मात्र, ज्या काळात सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली, तेव्हा हिंदुत्व कुठं होतं, हा प्रश्न विचारला जातोय. सत्ता टिकवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार आणि भूमिका झटकणाऱ्यांनी आज पुन्हा हिंदुत्वाची आठवण काढणं म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे, असं निरीक्षण अनेक राजकीय विश्लेषकांनी नोंदवलं आहे.
ठाकरे यांनी भाजपवर आरोप केला की, ते हिंदू-मुस्लिम समाजात फूट पाडतात. पण स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी मुस्लीम मतांसाठी अनेक तडजोडी केल्या, मग आता त्याच भाजपवर आरोप करणे म्हणजे निव्वळ दुटप्पीपणा आहे, असं विरोधक म्हणतात.
EVM घोटाळ्याचा मुद्दा अनेक वेळा फेटाळला गेला असूनही, पुन्हा पुन्हा त्याच आरोपांचं पुनरुच्चारण करणे हे केवळ जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे.
वक्फ बोर्डाच्या विरोधात आवाज उठवण्याचा दावा करत असताना, उद्धव ठाकरे हेच काँग्रेसच्या मतपेटीसाठी तृष्टीकरणाला पाठीशी घालतात, हे विसरता येणार नाही.
ठाकरे यांनी भाजपवर ‘फेक नरेटिव्ह’ तयार करण्याचा आरोप केला, पण ‘जय श्रीराम’ बोलताना ‘जय शिवराय’ म्हणण्याची अट घालून ते स्वतःच भावनिक प्रॉपेगंडा रचत आहेत. हिंदुत्व म्हणजे विभाजन नव्हे, पण निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्व आठवणं ही निव्वळ मतांसाठी केलेली नाटकी आठवण वाटते.
