विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर :
“महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज हे खरे राष्ट्रीय नायक आहेत, औरंगजेब नव्हे,” असे ठाम मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. औरंगजेबासारख्या क्रूर आणि धर्मांध शासकाचे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये उदात्तीकरण करण्यात आले, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “हीच कारणं आहेत की काही लोक आजही औरंगजेबाला हिरो बनवण्याचा प्रयत्न करतात,” असा आरोप करत त्यांनी डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांवर टीका केली. ( Exaltation of Aurangzeb in historyRajnath Singh hits out at leftwing historians)
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना राजनाथ सिंह म्हणाले, “देश स्वतंत्र झाल्यानंतर इतिहास लेखनात काही राष्ट्रनायकांना दुर्लक्षित करण्यात आले. डाव्या विचारांच्या इतिहासकारांनी महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना हक्काचे स्थान दिले नाही.” त्यांनी असेही नमूद केले की, महाराणा प्रताप हे शिवाजी महाराजांचे प्रेरणास्रोत होते आणि या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान नेता देशाला दिला.
राजनाथ सिंह यांनी औरंगजेबाच्या क्रौर्याची आठवण करून दिली. “पंडित नेहरूंनी देखील औरंगजेबाला धर्मांध आणि हिंदुविरोधी शासक म्हटले आहे. त्याने जझिया कर लावला, मंदिरांची तोडफोड केली, राजपूत, शीख, मराठा आणि राष्ट्रकुट यांच्यावर दडपशाही केली. असा शासक कोणताही आदर्श कसा ठरू शकतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“आम्ही धर्माच्या आधारावर राजकारण करत नाही,” असे स्पष्ट करत राजनाथ सिंह म्हणाले, “आपल्यासाठी सर्व भारतीय समान आहेत. आमची संस्कृती ही समभावाची आहे. आम्ही आमचे आदर्श शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याकडून शिकतो. ते इस्लामविरोधी नव्हते.” त्यांनी उदाहरण दिले की, हकीम खान सुरी यांनी हल्दीघाटीच्या लढाईत महाराणा प्रतापांसोबत लढा दिला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये मुस्लिम समाजातील मदारी हा अत्यंत विश्वासू सैनिक होता.
राजनाथ सिंह यांनी आवाहन केले की, “आजच्या तरुण पिढीला आपल्या इतिहासातील खरे नायक आणि त्यांचे बलिदान समजावणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील पात्र नाहीत, ते प्रेरणास्थान आहेत.”
