विशेष प्रतिनिधी
मुंबई :
“पूर्वी काँग्रेसच्या सत्ताकाळात शिवसैनिकांना धमक्या यायच्या – ‘काँग्रेसमध्ये या, नाहीतर टाडा लावतो.’ आज पुन्हा त्याच पद्धतीने आमच्यावर दबाव आणला जातोय. पोलिसांचा वापर हा आपल्या टोळीतील माणसांसारखा केला जातो आहे. जुनी प्रकरणं उकरून काढून पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ( Join Congress or Face TADA Threats Uddhav Thackeray Recalls Past Intimidation Slams Current Use of Police for Political Pressure)
‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ या ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार कुमार केतकर, खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत आणि पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आदी उपस्थित होते.
राजकारणात संघर्ष हवाच, पण गुन्हेगारी नव्हे
“मी लहानपणापासून शिवसेनेची वाटचाल पाहतोय. राजकीय मतभेद असतातच, आंदोलने होतात. पण त्यात गुन्हेगारी नसावी, हे महत्त्वाचे आहे. आजची पत्रकारिता ‘क्राईम्स ऑफ इंडिया’ झाली आहे. पेपर चालवण्यासाठी गुन्हेगारांची गरज भासते का, असा प्रश्न पडतो,” अशी टीकाही त्यांनी माध्यमांवर केली.
अंडरवर्ल्ड व न्यायव्यवस्थेतील कथित संबंधांचा उल्लेख
पुस्तकातील छोटा शकील आणि न्यायाधीशांमधील संभाषणाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, “जर एखादा गुंड थेट न्यायाधीशांना सांगत असेल, ‘माझं काम करून दे’, तर सामान्य माणसाने न्यायासाठी कुणाकडे जायचं?”
पोलिस यंत्रणांवर विश्वास, पण…
“पोलीस हे एक शस्त्र आहे. त्या शस्त्राचा वापर योग्य पद्धतीने झाला तर समाज निरोगी राहतो. पोलिसांना स्वायत्तता दिली, तर ते चमत्कार करू शकतात,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका, सत्ताधाऱ्यांना इशारा
उद्धव ठाकरे यांनी जुने अनुभव सांगत काँग्रेसच्या राजवटीवरही टोलाही लगावला. “त्या वेळी शिवसैनिकांना झुंडीत पकडून धमकावले जायचे. आजही तसाच सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे,” असे सांगत त्यांनी राजकीय विरोधकांवर पोलिसांद्वारे दबाव आणल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.
