विशेष प्रतिनिधी
मुंबई : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि सक्रीय राजकारणापासून दूर राहिलेल्या आमदार धनंजय मुंडे यांच्या तब्येतीबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना, “धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला आहे, त्यांचे डोळे वाकडे झाले आहेत आणि बोलणेही कठीण झाले आहे,” असे विधान केले होते.. मात्र खुद्द धनंजय मुंडे यांनी यावर सोशल मीडियावरून स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
( Its not a stroke I have Bells Palsyexplains MLA Dhananjay Munde)
धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले की, “माझ्या चेहऱ्यावर झालेल्या त्रासामुळे मला बोलायला अडचण येत आहे, परंतु मला अर्धांगवायूचा झटका नाही. मला सुमारे दीड महिना आधी बेल्स पाल्सी हा आजार झाला होता. याचा परिणाम फक्त चेहऱ्यावर झाला असून मी वैद्यकीय उपचार घेत आहे. याशिवाय, डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठीही काही दिवसांपूर्वी मी मुंबईत उपचार घेत होतो.”
मुंडे यांनी बाबासाहेब पाटील यांच्या काळजीच्या भावनेबद्दल आभार व्यक्त केले. ,मात्र अर्धांगवायूबाबतची माहिती चुकीची असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, बाबासाहेब पाटील यांच्याशी दोन दिवसांपूर्वीच माझी बैठक झाली होती. त्यांनी माझ्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्याबद्दल मी आभार मानतो,”
धनंजय मुंडे यांचे नाव अलीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत आले होते. त्यांच्या निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते सार्वजनिक जीवनात कमीच दिसले, आणि अजित पवारांच्या दौऱ्यावेळीही ते अनुपस्थित राहिले होते.या पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती आणि आरोग्याबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र मुंडे यांच्या स्पष्ट वक्तव्यानंतर परिस्थिती स्पष्ट झाली आहे.
