छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राचे उद्योग मॅग्नेट, नवीन उद्योगांची रांग, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचे उद्योग मॅग्नेट आता छत्रपती संभाजीनगर-जालना होत आहे. औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केलेली १० हजार एकर जागा आता संपली असून एकही प्लॉट शिल्लक नाही. त्यामुळे नव्याने ८ हजार एकर जागेचे भूसंपादन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ( Chhatrapati Sambhajinagar is the industrial magnet of Maharashtra a row of new industriesChief Minister’s assertion)

‘सीएमआयए’तर्फे आयोजित उद्योजकांच्या बैठकीत फडणवीस यांनी ही घोषणा केली. त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रातील उद्योगांबाबत उद्योजकांनी योग्य प्रस्ताव करून दिल्लीत यावे, अशी सूचना या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उद्योजकांना केली.

रामा इंटरनॅशनल’मध्ये उद्योजकांची राजनाथ सिंह यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली. या वेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणनमंत्री जयकुमार रावल, इतर मागास वर्ग कल्याण व अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, सीएमआयएचे अध्यक्ष अर्पित सावे, सचिव अथर्वेशराज नंदावत यासह अनेक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संघटनेने एक हजार एकरमध्ये ‘डिफेन्स पार्क’ उभारणीची मागणी केली.

छत्रपती संभाजीनगरातील पायाभूत सुविधा पाहून आता इतरत्र जाण्याची उद्योगांना इच्छा नाही. येथे इंडस्ट्रियल इको सिस्टिम तयार झाली आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ उद्योजकांनी हे सर्व तयार केले आहे. कर्नाटक सरकार सर्व सुविधा देण्यासाठी तयार होते. मात्र, टोयोटाने येथील सुविधा पाहून संभाजीनगरची निवड केली. आता डिफेन्स उद्योगासाठी पार्क तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले. ‘डिफेन्स क्लस्टर’ तयार करून त्यांच्यातील क्षमतांना चालना द्यावी, अशी मागणी केली.

फडणवीस म्हणाले की, मी अनेक शहरात उद्योजकांना भेटतो. मात्र येथे उद्योजक संघटनांमध्ये शहराच्या विकासासाठी एकत्रित येऊन काम करण्याची इच्छा पाहतो, ती इतरत्र कुठेच दिसत नाही. छत्रपती संभाजीनगर इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून काम करत आहेत. राज्यातले उद्योगाचे मॅग्नेट छत्रपती संभाजीनगर, जालन्यात शिफ्ट होणार हे मी सांगत होतो. आज ‘डीएमआयसी’ प्रकल्प १० हजार एकरांवर उभा आहे. सध्या येथे जागा शिल्लक नाही. नवीन उद्योगांची रांग लागली आहे. अनेक उद्योग येण्यासाठी तयार आहेत.