विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्यात युती होणार की नाही, याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट सवालांचा वर्षाव केला आहे.
( Crimes against 17 thousand MNS soldiers while he was the Chief Minister
Will Uddhav Thackeray apologize Sandeep Deshpandes questions
संदीप देशपांडे म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसे सैनिकांवर तब्बल १७,००० गुन्हे दाखल झाले होते. आज जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे, तर त्या काळातील चुकीबद्दल उद्धव ठाकरे यांनी माफी मागणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.”
देशपांडे म्हणाले, “भाजपने कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण नाही, याचे प्रमाणपत्र देऊ नये. उद्धव ठाकरे यांनीही कोणाला ‘महाराष्ट्रद्रोही’ ठरवण्याचा हक्क स्वतःकडे घेऊ नये. राजकारणात आज सर्व पक्षांनी एकत्र येऊन मराठी अस्मितेच्या प्रश्नांवर बोललं पाहिजे.”
देशपांडे यांनी युतीच्या चर्चेला केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता, सध्याच्या ज्वलंत मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरजही व्यक्त केली. “हिंदी सक्ती, मराठी भाषा, परप्रांतीयांचा मुद्दा, आणि बँकांमध्ये मराठीचा अभाव हे विषय अधिक महत्त्वाचे आहेत,” असे ते म्हणाले.
तसेच उद्धव ठाकरे यांनी हिंदीविरोधी आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा द्यावा, अशीही मागणी संदीप देशपांडे यांनी केली.
