विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व स्तरातून या क्रूर हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त होत असतानाच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ( Robert Vadras political tone despite the countrys mourning draws criticism from political circles)
रॉबर्ट वाड्रांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना, “मी सरकारबाबत अतिशय चिंतेत आहे,” असे सांगितले. तसेच, “दहशतवादी हल्ला ही आपला मुद्दा मांडण्याची एक पद्धत आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारवर आणि हिंदुत्वावर टीका केली. त्यांनी म्हटले की, “जेव्हा मशिदीबाबत बोललं जातं, अल्पसंख्याकांना प्रार्थना करण्यास रोखलं जातं, तेव्हा देशात सांप्रदायिकता वाढते. आयडी पाहून लोकांना मारलं जातं, चर्च जाळले जातात – यामुळे देशात फूट पडते. आपल्या देशात सरकार हिंदुत्वाबाबत बोलते. जेव्हा तुम्ही मशिदीबाबत बोलतात किंवा तुम्ही अशी किंवा तशी प्रार्थना करू शकत नाही, असं म्हणतात तेव्हा अल्पसंख्याकांना अस्वस्थ वाटते. अशाप्रकारची गोष्टी अराजकता, सांप्रदायिकता वाढवतात. जर तुम्ही ही दहशतवादी घटना बघितली तर ते लोक पर्यटकांचे आयडी चेक करत होते. ते असं का करत होते, कारण आपल्या देशात हिंदू , मुस्लीम आणि ख्रिश्चनांमध्ये एक विभाजन झालेलं आहे.
याशिवाय, मी व्हिडीओ फुटेज बघितले आहेत की, चर्च जाळली गेली आहेत. काय घडत आहे? आपल्या देशात सांप्रदायिक भावना का दुखावल्या जात आहेत? हे फूट निर्माण करत आहेत. अशा संघटनांना वाटत आहे की मुस्लिमांसाठी हिंदू धोका आहेत. आपल्याला हे नकोय. तुम्ही बहुतांश हिंदू-मुस्लिमांना विचारा, ते एकमेकांची मदत करतात. कोविडमध्ये त्यांनी असं केलंय. ते राजकारण नाही समजत. निवडणूक जिंकणारं राजकारण त्यांना नाही समजत. आयडी बघून मारण्याचा मेसेज आहे. हा मेसेज पंतप्रधानांसाठी आहे. मुस्लिम आणि अल्पसंख्याकांना धास्ती वाटत आहे, असे ते म्हणाले.
मात्र रॉबर्ट वाड्रांचे हे वक्तव्य देशावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना दिले गेले असल्याने, अनेकांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय टीकाकारांचं म्हणणं आहे की, ज्या वेळी देश हल्ल्याच्या वेदनेत आहे, त्या वेळी राजकीय एजेंडाचं विष पेरणं दुर्दैवी आहे. “२८ नागरिकांचे प्राण गेले, संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे आणि अशावेळी रॉबर्ट वाड्रा सरकारवरच टीका करत राजकारण करत आहेत. हाच काँग्रेसचा चेहरा आहे,” अशा प्रतिक्रिया भाजपच्या अनेक नेत्यांनी दिल्या आहेत.
देशातील सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन या हल्ल्याचा निषेध केला असताना, वाड्रांचे वक्तव्य फूट पाडणारे आणि असंवेदनशील असल्याचा आरोप होत आहे.
यामुळेच, देशप्रेमाच्या नावे राजकीय हेतू साधण्याच्या या प्रकारावर जनतेमध्येही संतप्त भावना उमटत आहेत. एका बाजूला देश एकत्र येऊन शत्रूविरोधात कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे काही नेते अद्याप धार्मिक द्वेषात व्यस्त असल्याचं चित्र उभं राहतंय.
