सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना त्यांची जागा दाखवली, मुख्यमंत्र्यांनी खडसावले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : संविधान हातात घेऊन फिरणारे राहुल गांधी आता सर्वोच्च न्यायालयाचा तरी मान ठेवणार का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टानेच चपराक लावल्याचेही ते म्हणाले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने सक्त ताकीद दिली आहे. अशा वक्तव्यांची पुनरावृत्ती झाल्यास कोर्ट स्वतःहून (सुओ मोटो) कारवाई करेल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. ( Supreme Court shows Rahul Gandhi his seat CM reprimands him)
यावर राहुल गांधींना खडसावताना फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने चपराक लगावली आहे. रोज हातात संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा तरी मान ठेवणार का? असा माझा त्यांना प्रश्न आहे. यापुढे स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान राहुल गांधी करणार नाहीत, अशी मला अपेक्षा आहे. सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो की सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना त्यांची जागा दाखवली.

ज्याप्रकारे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नायकांना राहुल गांधी अपमानित करत होते, आता ते अपमानित करणार नाहीत, अशी अपेक्षा असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवलं. तुमचे क्लायंट जाणतात का, महात्मा गांधींनीही व्हॉइसरॉयना पत्रात ‘युअर फेथफुल सर्व्हंट’ असं संबोधलं होतं? त्यांची आजी, इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना सावरकरांचे कौतुक करत पत्र लिहिलं होतं, हे त्यांना माहीत आहे का?”, असा सवाल न्यायमूर्ती दत्तांनी राहुल गांधींचे वकील वरिष्ठ अधिवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांना विचारला.
“आपण इतिहास किंवा भूगोल न समजून अशा वक्तव्यांद्वारे फूट पाडू नका. राजकीय नेत्याला आपल्या भूमिकेशी जबाबदारीने वागायला हवं,” असंही त्यांनी सुनावलं.

राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी एका पत्रकार परिषदेत सावरकर यांना “ब्रिटिशांचे नोकर” आणि “ब्रिटिशांकडून पेन्शन घेणारे” असल्याचं म्हटलं होतं. यावरून अ‍ॅड. नृपेन्द्र पांडे यांनी लखनौ कोर्टात खटला दाखल केला होता. डिसेंबरमध्ये न्या. आलोक वर्मा यांनी गांधींना आरोपी म्हणून समन्स बजावला होता.