एक तर सिंधू नदीतून पाणी वाहिल किंवा त्यांचे रक्त, बिलावल भुत्तोची पोकळ वल्गना

विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : सिंधू नदी पाकिस्तानची आहे आणि भारताने तिचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम भारताला भोगावे लागतील. सिंधू नदी आमची होती, आमची आहे आणि आमचीच राहील… एकतर या नदीचे पाणी वाहत राहील किंवा आमची नदी आमच्याकडून हिसकावून घेऊ पाहणाऱ्यांचे रक्त वाहिल, अशी पोकळ वल्गना पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पीपीपीचे प्रमुख बिलावल भुत्तो झरदारी याने केली आहे. ( Either water will flow from the Indus River or their bloodthe hollow slur of Bilawal Bhutto.)

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानसाठी महत्त्वाचा असलेला सिंधू जल करार भारत सरकारने स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे.

एका रॅलीत जनतेला संबोधित करताना बिलावल भुत्तो म्हणाला, सिंधू नदीजवळ उभे राहून भारताला स्पष्ट शब्दांत सांगतो… सिंधू नदी आमची होती, आमची आहे आणि आमचीच राहील… एकतर या नदीचे पाणी वाहत राहील किंवा आमची नदी आमच्याकडून हिसकावून घेऊ पाहणाऱ्यांचे रक्त वाहिल.

दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध निर्णायक पावलं उचलली आहेत. देशाच्या अस्मितेला आणि सुरक्षेला हादरवणाऱ्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधूजलकरार’ तातडीने स्थगित केला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या निर्णयामुळे बिथरलेले पाकिस्तान पिपल्स पार्टीचे (PPP) अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी एका सभेत भारताला खुलेआम धमकी दिली.

भुट्टोंनी भारतावर आरोप केला की, पहलगाम हल्ल्याच्या अंतर्गत सुरक्षेतील त्रुटी झाकण्यासाठी पाकिस्तानवर दोष ढकलला जात आहे. मात्र वास्तविकता अशी आहे की, ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (TRF) या लष्कर-ए-तैयबा शी संबंधित गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून, जगालाही ठाऊक आहे की, या गटांचे मूळ पाकिस्तानातच आहे.

पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध तोडले. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना हाकलले, अटारी सीमारेषेवरील भूमिगत वाहतूक थांबवली या सर्व कृतींनी भारताने स्पष्ट केले आहे की, देशाच्या सुरक्षेवर कोणताही घाला घालणाऱ्याला आम्ही माफ करणार नाही.

१९६० साली पंडित नेहरू आणि अयुब खान यांच्या दरम्यान झालेला सिंधू जलकरार हा शांततेच्या दिशेने मोठा पाऊल होता. करारानुसार, भारताला रावी, बियास आणि सतलज नद्यांचा वापर मिळाला, तर पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाबच्या पाण्याचा जास्त वाटा मिळाला. भारताने गेली अनेक दशके संयम ठेवत हा करार पाळला. पण सततच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे आणि पाकिस्तानच्या शत्रुत्वाने अखेर भारताला कठोर निर्णय घ्यावा लागला.

भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तान सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ आणि भुट्टो-झरदारी यांच्यात आपत्कालीन बैठक झाली असून, त्यांनी देशांतर्गत जलप्रकल्पांबाबत नव्याने आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

सिंधू नदी भारतातून उगम पावते आणि भारताला तिच्या प्रवाहावर कायद्यानुसार हक्क आहे. कोणत्याही दबावाला न झुकता, देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या हितासाठी भारत सर्वतोपरी लढेल, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.