विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम येथे घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अधिक कठोर भूमिका घेतली असून, “पाकिस्तानला या दहशतवादी कारवायांची मोठी किंमत चुकवावी लागेल,” असा स्पष्ट इशारा केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिला आहे. ( Pakistan will have to pay a heavy price for the Pahalgam attackwarns Hardeep Puri)
सिंधू जलकरार निलंबित केल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला धमकी दिली होती. सिंध प्रांतातील सुक्कर येथे सभेत बोलताना त्यांनी म्हटलं होतं, “सिंधू नदी आमची आहे आणि ती आमचीच राहील. जर या नदीतून पाणी वाहिलं नाही तर भारताचं रक्त वाहिल.”
या वादग्रस्त विधानावर प्रत्युत्तर देताना हरदीप पुरी यांनी तीव्र शब्दात टीका केली. ते म्हणाले, “बिलावल म्हणतो की जर पाणी मिळालं नाही तर रक्त वाहिल. मग त्याला सांगा, आधी स्वतःचं रक्त कुठे सांडायचं ते ठरवावं. पाणीच नसेल तर उडी मारायलाही जागा उरणार नाही. या प्रकारची वक्तव्यं पूर्णपणे हास्यास्पद आहेत आणि त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.”
पुरी यांनी पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देताना हे ठामपणे सांगितले की, “ही घटना कोणत्याही वैयक्तिक रागातून नव्हे, तर राज्य पुरस्कृत दहशतवादाचा भाग आहे. पाकिस्तानकडून मागील २० वर्षांपासून अशीच कृत्ये केली जात आहेत, याची कबुली खुद्द त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे.”
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगदी स्पष्ट केले आहे की पाकिस्तानने जर दहशतवादाचा मार्ग सोडला नाही तर त्याला मोठी किंमत मोजावी लागेल. पहलगाम हल्ला हा केवळ एक अपघात नाही, तर एक योजनाबद्ध रचलेली सीमापारची दहशतवादी कारवाई आहे.”
दरम्यान, भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध अधिक ताणले आहेत. सिंधू जल कराराचे अंमलबजावणी थांबवण्याचा निर्णय याचाच भाग असून, त्यामुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरही दबाव वाढला आहे. पाकिस्तानची आतली अवस्था आधीच आर्थिक आणि राजकीय संकटांनी ग्रासली आहे, त्यात आता भारताचा कठोर प्रतिसादही मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
भारताकडून मिळणाऱ्या पाण्यावर पाकिस्तानची कृषी व्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे सिंधू करार निलंबनाचा परिणाम तिथल्या शेतकऱ्यांपासून ते राजकारणापर्यंत सर्वच पातळ्यांवर जाणवणार आहे. अशा परिस्थितीतही बिलावल भुट्टोंसारख्या नेत्यांकडून रक्तपाताच्या धमक्या दिल्या जात असल्या तरी, भारताने संयम राखत कठोर निर्णय घेण्याची भूमिका घेतली आहे.
