मंत्री जयकुमार गोरे बदनामीच्या प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकर पोलिसांचे समन्स

विशेष प्रतिनिधी

मुंबई: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या प्रकरणात विधानपरिषदेचे माजी सभापती आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहे. (Police summons Ramraje Naik Nimbalkar in defamation case against Minister Jayakumar Gore)

जयकुमार गोरे यांची बदनामी करून खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात वडूज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी पत्रकार तुषार खरात आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे. आता, या तपासाच्या प्रकरणात आता रामराजे निंबाळकर यांची चौकशी करण्यात येणार आहे. शनिवारी, 3 मे रोजी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची सूचना निंबाळकर यांना देण्यात आली आहे.

बदनामी थांबवायची असेल तर ५ कोटी रुपयांची खंडणी द्या, अन्यथा आणखी महिलांकडून खोटे गुन्हे दाखल करायला सांगेन, अशी धमकी दिल्याप्रकरणी लय भारी या युट्यूब चॅनलचा पत्रकार तुषार ऊर्फ तात्यासोा आबाजी खरात (मूळ रा. पांढरवाडी, ता. माण, सध्या रा. मुंबई) यांना दहिवडी पोलिसांनी अटक केलेली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वत: याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गोरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, तुषार खरात यांनी सोशल मीडियावर वारंवार माझ्याबाबत जाणीवपूर्वक, हेतूपुरस्पर मानहानीकारक व बदनामीकारक पोस्ट प्रसिद्ध केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी खरात यांनी माझे कार्यकर्ते बळवंत पाटील यांना मुंबई येथे बोलावून घेतले.त्यावेळी त्या भेटीत खरात हे पाटील यांना म्हणाले की, ‘जयकुमार गोरे यांना मिटवून घ्यायला सांगा. अन्यथा त्यांचे मंत्रिपद मी घालवणार आहे. मिटवायचे असेल तर मंत्री जयकुमार गोरे यांना ५ कोटी रुपये द्यायला सांगा. त्यामधील १ कोटी रक्कम तक्रारदार महिलांना देणार आहे. उर्वरित रक्कम माझ्यासाठी ठेवणार आहे.

त्यानंतर गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटींची खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली होती . जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना त्या महिलेला अटक करण्यात आली.

यापूर्वी माजी सनदी अधिकारी आणि शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख, खासदार सुप्रिया सुळे आणि आणि आमदार रोहित पवार यांची नावे या प्रकरणात चर्चेत आली होती.