भारतीय सैन्याची अचूक हवाई कारवाई, पाकचे लष्करी ठाणे उद्ध्वस्त

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तर देताना, भारतीय सैन्याने नियंत्रणरेषेपलीकडील (LoC) पाकिस्तानी लष्करी ठाण्यावर अचूक हवाई कारवाई केली असून त्याचा व्हिडिओ अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आला आहे. जम्मू-कश्मीरमधील सीमावर्ती भागात ही कारवाई झाल्याची माहिती सैन्यस्रोतांकडून देण्यात आली आहे. ( Indian Army Releases Video of Precision Strikes on Pakistani Post Amid Ceasefire Violations)

ही कारवाई पाकिस्तानकडून मे ८ आणि ९ च्या मध्यरात्री ड्रोन आणि इतर शस्त्रांनी भारताच्या पश्चिम सीमेवर सुरु केलेल्या मोठ्या प्रमाणातील हल्ल्यांनंतर झाली आहे. या हल्ल्यांमध्ये नियंत्रण रेषेवरील कुपवाडा, उरी या भागात वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारतीय सैन्याने या सर्व ड्रोन हल्ल्यांना यशस्वीपणे परतवून लावले असून, प्रत्येक उल्लंघनाला “योग्य प्रत्युत्तर” दिल्याचे सैन्याने स्पष्ट केले आहे.

भारतीय सैन्याने X या माध्यमातून सांगितले की, अनेक पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य करत तीव्र प्रत्युत्तर देण्यात आले आहे. कारवाईचे ठिकाण अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नसले तरी, या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्या आहेत.

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. या कारवाईत इस्लामाबाद, लाहोर, सियालकोट येथील नऊ दहशतवादी केंद्रांना लक्ष्य करण्यात आले होते.

या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याचे दहा नातेवाईक व त्याचे चार मुख्य सहकारी मारले गेल्याची माहिती आहे.

भारताच्या या अचूक आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे देशाच्या ‘दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता’ या धोरणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. भारताची सार्वभौमत्व आणि सीमांची अखंडता कायम राखण्यासाठी भारतीय सैन्य सजग असून, कोणत्याही आक्रमक कारवाईला कडक प्रत्युत्तर दिले जाईल, हे भारतीय लष्कराने पुन्हा अधोरेखित केले आहे.