विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले असताना चीनने थेट पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहत आपला स्पष्ट पाठिंबा जाहीर केला आहे. “पाकिस्तानच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी चीन कायमस्वरूपी त्याच्या बाजूने राहील,” असे आश्वासन चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संवादात दिल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.
( China takes Pakistans side gives taste of standing permanently for sovereignty and territorial integrity
नुकत्याच पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’) अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. त्यानंतर युद्धविरामाच्या चर्चांदरम्यानही कथित उल्लंघनांमुळे परिस्थिती अधिकच चिघळली. या पार्श्वभूमीवर चीनकडून पाकिस्तानला दिला गेलेला हा स्पष्ट पाठींबा पाकिस्तानसाठी महत्वाचा ठरणार आहे.
चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री ‘ऑल वेदर फ्रेंडशिप’ म्हणून प्रसिद्ध आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका (CPEC), ग्वादार बंदराचा विकास, संरक्षण करार आणि अनेक सामरिक प्रकल्पांमुळे दोन्ही देशांचे संबंध अधिकाधिक दृढ झाले आहेत. याउलट, भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप हा भारतासाठी धोका निर्माण करणारा ठरतो आहे. विशेषतः, पाकिस्तानप्रमाणेच नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेतील आर्थिक गुंतवणुकीद्वारे चीन आपला प्रभाव वाढवत आहे.
जागतिक पातळीवर अमेरिका, युरोपियन संघ व मित्रदेशांकडून भारताला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन मिळत असताना, चीनकडून पाकिस्तानचा घेतलेला पवित्रा दक्षिण आशियातील सत्तासंतुलन धोक्यात आणू शकतो. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघांनी दोन्ही देशांनी संयम बाळगावा, असे आवाहन केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, चीनच्या वक्तव्यामुळे या आवाहनांची विश्वासार्हता कमी होत आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
भारत सरकारने अद्याप चीनच्या या भूमिकेवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र संरक्षण व परराष्ट्र मंत्रालयाच्या गुप्त सल्लामसलती सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुढील काही दिवसांत भारताकडून अधिक कठोर भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
