विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत जेव्हा जेव्हा दहशतवादाविरोधात कारवाई करतो, तेव्हा दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांसाठी सीमेपलीकडील भूमी देखील सुरक्षित ठिकाण नसते याचाच ऑपरेशन सिंदूर पुरावा असल्याचा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. ( Operation Sindoor is proof that even the land across the border is not safe for terrorists warns Defense Minister Rajnath Singh)
राजनाथ सिंह यांच्या हस्ते आभासी पद्धतीने लखनऊमधील ब्रह्मोस एकात्मिकीकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर” ही केवळ लष्करी कारवाई नव्हती, ती भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं प्रतीक होती . ही कारवाई केवळ सीमेपलीकडील दहशतवाद्यांविरोधातच नव्हे, तर भारताच्या भूमीवर घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिक गमावलेल्या कुटुंबांना न्याय मिळवून देणारी ठरली. उरी, पुलवामा आणि आता पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दाखवलेली ठोस कृती ही जगासाठी एक स्पष्ट संदेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणाचा पुनरुच्चार करत सिंह म्हणाले की, “भारत जेव्हा कारवाई करतो, तेव्हा दहशतवाद्यांसाठी कोणतीही भूमी सुरक्षित राहत नाही. आपली कारवाई केवळ सैन्य तळांपुरती मर्यादित नसून रावळपिंडीसारख्या मुख्यालयांपर्यंत पोहोचते.”
ही कारवाई केवळ पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठीच राबवली गेली, या कारवाईत निष्पाप नागरिकांना लक्ष्य करण्यात आले नव्हते ही बाबही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली. तरी देखील पाकिस्तानने मात्र भारतातील नागरी भागांना लक्ष्य केले आणि मंदिरे, गुरुद्वारा तसेच चर्चवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला . आपल्या सशस्त्र दलांनी शौर्य आणि संयमाचे दर्शन घडवत पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर हल्ला करून सडेतोड उत्तर दिले असे ते म्हणाले. आपण केवळ सीमेजवळच्याच लष्करी तळांवर कारवाई केली नाही, तर आपल्या सशस्त्र दलांचा धडाका पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीपर्यंत पोहोचला असे राजनाथ सिंह म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरमुळे जगाला भारताचा निर्धार दिसून आला असून, दहशतवाद सहन न करण्याचा स्पष्ट संदेश यातून गेला आहे.
