विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :
भारत-पाकिस्तान संघर्षात संपूर्ण जग भारताच्या बाजूने उभं असताना, तुर्कस्तान आणि अझरबैझानने पाकिस्तानला पाठिंबा दिला. यामुळे भारतीयांमध्ये तीव्र संताप उसळला असून, देशातील ट्रॅव्हल एजंट्सनी या दोन्ही देशांविरुद्ध पाऊल उचललं आहे.
( Forget Istanbul-Baku! Tourism to Turkey Azerbaijan banned due to anti-India stance!)
ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडिया (TAAI) या देशभरातील ३,५०० हून अधिक ट्रॅव्हल एजंट्सच्या संघटनेने तुर्कस्तान आणि अझरबैझानच्या सर्व पर्यटन बुकिंगवर बंदी घातली आहे. इस्तंबूल आणि बाकूच्या दिशेने जाणाऱ्या टूर पॅकेजेसवर याचा थेट परिणाम होणार आहे. इतकंच नव्हे, तर याआधी जे पर्यटक या देशांची बुकिंग करून बसले आहेत, त्यांनाही प्रवास रद्द करण्याचा सल्ला दिला जात आहे.
टीएएआयच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड युनिटचे अध्यक्ष हमेंद्र सिंह जादौन यांनी स्पष्ट केलं की, तुर्कस्तान व अझरबैझानने पाकिस्तानच्या बाजूने उभं राहून भारताच्या हिताला धक्का दिला आहे. त्यामुळे या देशांच्या विरोधात ट्रॅव्हल बहिष्कार जाहीर करण्यात आला आहे. संघटनेने भारत सरकारला देखील यासंदर्भात कठोर ट्रॅव्हल नियमावली जारी करण्याची विनंती केली आहे.
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशांमध्ये चीनसोबतच तुर्कस्तान, अझरबैझान आणि कतार आघाडीवर आहेत. विशेषतः तुर्कस्तानने पाकिस्तानला ड्रोन तंत्रज्ञान देण्यास मदत केली होती. ही बाब भारतासाठी विश्वासघातासारखी ठरली आहे, कारण करोना काळात भारताने या देशांना मदत केली होती.
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. दरवर्षी तीन लाखांहून अधिक भारतीय पर्यटक तिथे जातात. अझरबैझानची परिस्थितीही फार वेगळी नाही. आता भारत सरकारने या दोन्ही देशांविरुद्ध कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले असून, विमान सेवा बंद करणे किंवा पर्यटन कंपन्यांवर दबाव आणणे असे उपाय योजले जाऊ शकतात.
या निर्णयामुळे तुर्कस्तान आणि अझरबैझानच्या पर्यटनावर मोठा परिणाम होणार असून, भारताने आता देशहिताला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
