विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :
पहलगाममध्ये २६ हिंदू पर्यटकांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण देश हादरला होता. या भीषण हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची शंका सुरुवातीपासूनच व्यक्त होत होती. मात्र आता समोर आलेल्या नव्या पुराव्यांमुळे ही शंका खरी ठरली आहे. ( Pakistans hand in Pahalgam attack clear Purchase of satellite images before the attack misuse of sensitive information by American company)
‘द प्रिंट’ या न्यूज पोर्टलच्या तपासात असे उघड झाले आहे की, अमेरिकेतील नामवंत अंतराळ तंत्रज्ञान कंपनी मॅक्सर टेक्नॉलॉजीज (Maxar Technologies,) कडून फेब्रुवारी २०२५ मध्ये पहलगाम परिसराच्या हाय-रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा विकत घेण्यात आल्या होत्या. या प्रतिमा पाकिस्तानातील Business Systems International Pvt. Ltd. (BSI) या कंपनीने मागवलेल्या होत्या. हल्ल्याच्या दोन महिने आधी झालेली ही विक्री, सामान्य मागणीपेक्षा दुप्पट होती. या प्रतिमांचा वापर थेट हल्ल्याच्या तयारीसाठी करण्यात आला, असा संशय आता बळावला आहे. ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी याबाबत एक व्हिडिओ केला आहे.
या BSI कंपनीचा संस्थापक ओबैदुल्ला सैयद याचा अमेरिकेतील अण्वस्त्र तस्करी प्रकरणाशी थेट संबंध आहे. त्याने 2006 ते 2015 दरम्यान Pakistan Atomic Energy Commission (PAEC) ला प्रतिबंधित संगणक उपकरणे आणि सॉफ्टवेअर पुरवले होते. याबद्दल अमेरिकेतील न्यायालयाने त्याला दोषी ठरवून कारावासाची शिक्षा सुनावली होती.
फेब्रुवारी 2025 मध्ये पहलगामसह पुलवामा, अनंतनाग, राजौरी, पूंछ आणि बारामुल्ला या संवेदनशील भागांतील उपग्रह प्रतिमा मागवण्यात आल्या. 12, 15, 18, 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी मागणीचा उच्चांक गाठण्यात आला. त्यानंतर 12 एप्रिल म्हणजे हल्ल्याच्या फक्त 10 दिवस आधी पुन्हा प्रतिमा मागवण्यात आली. हल्ल्यानंतरही 24 आणि 29 एप्रिलला प्रतिमा मागवण्यात आल्या, आणि त्यानंतर ऑर्डर अचानक बंद झाली.
या प्रतिमांचे रिझोल्यूशन 30 सें.मी. ते 15 सें.मी. इतके सूक्ष्म असून, यातून रस्त्यावर चालणाऱ्या माणसांचे चेहरेदेखील स्पष्ट ओळखता येतात. एक प्रतिमा सुमारे 3 लाख रुपयांना विकली जाते आणि सैनिक हालचाली, चेकपोस्ट्स, घुसखोरी मार्ग यांचे अचूक विश्लेषण यातून शक्य होते.
इस्त्रोच्या (ISRO ) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, “Maxar सारखी आंतरराष्ट्रीय कंपनी BSI सारख्या संशयित आणि दहशतवादाशी संबंधित कंपनीशी व्यवहार करत असेल, तर तो भारताच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे.” भारत सरकारने Remote Sensing Data Policy, Geospatial Guidelines आणि Spacecom Policy जाहीर केल्या असल्या, तरी खासगी आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे अनियंत्रित व्यवहार या धोरणांना धक्का देत आहेत.
भारत सरकारने या घडामोडींची गंभीर दखल घेतली घेण्याची गरज आहे . Maxar आणि इतर अंतराळ सेवा पुरवठादारांवर नियंत्रण आणण्यासाठी नव्या मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतातील संवेदनशील माहिती परदेशी हातात जाऊ नये यासाठी ISRO आणि खासगी स्टार्टअप्ससाठी स्पष्ट सुरक्षा फ्रेमवर्क आवश्यक आहे.
पहलगाम हल्ला केवळ सीमापार दहशतवादी कारवाई नव्हती, तर संपूर्णपणे नियोजित, तांत्रिक माहितीच्या आधारे घडवलेला कट होता. पाकिस्तानचा ISI, अण्वस्त्र यंत्रणा आणि दहशतवादी संघटनांचा संगनमताने घातलेला हा कट उघड झाला आहे.
