लग्नात डीजेवर तलवार हातात घेऊन नाचले… आमदार सिद्धार्थ खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

बुलढाणा : राजकीय जबाबदारी आणि सार्वजनिक वर्तन यामध्ये संतुलन आवश्यक असताना, माजी प्रशासकीय अधिकारी व सध्या शिवसेना ठाकरे गटाचे आमदार असलेले सिद्धार्थ खरात हे एका लग्न समारंभात तलवार हातात घेऊन डीजेवर नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार चिखली तालुक्यातील अमडापूर येथे बुधवारी झालेल्या लग्न समारंभात घडला. ( A case has been registered against MLA Siddharth Kharat for dancing with a sword in his hand at a wedding DJ.)

व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणावर समाज माध्यमांतून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय वर्तुळातही टीका होत आहे. शस्त्रांचे अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करणे भारतीय शस्त्र कायद्यानुसार निषिद्ध आहे, आणि त्याचाच आधार घेत अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक वर्तणुकीबाबत लोकप्रतिनिधींनी अधिक सजग राहण्याची गरज असताना, एका जबाबदार पदावर असलेल्या आमदाराकडून असे कृत्य घडल्याने अनेकांनी टीका केली आहे. खरात हे पूर्वी प्रशासनात अधिकारी होते आणि त्यानंतर राजकारणात दाखल झाले. त्यामुळे “शिस्तीचे उदाहरण” असणाऱ्या व्यक्तीकडून कायद्याचे उल्लंघन झाल्याचे चित्र सध्या रंगवले जात आहे.

काही महिन्यांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता सिद्धार्थ खरात यांनीही तसाच प्रकार घडल्यामुळे पोलीस कारवाई झाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात यांच्या विरोधात शस्त्र कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, तपास सुरू आहे. संबंधित व्हिडिओही पुरावा म्हणून जप्त करण्यात आला आहे.