माओवादी कार्यकर्ता ‘लॅपटॉप’ एका शॉर्ट फिल्ममध्ये हिरो म्हणून झळकला! विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

पुणे : गेल्या १५ वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर असलेला आणि माओवादी चळवळीशी संबंधित असल्याचा आरोप असलेला प्रशांत जलिंदर कांबळे ऊर्फ ‘लॅपटॉप’ (वय ४४) याला अखेर मे महिन्यात पुण्यातून अटक करण्यात आली. धक्कादायक म्हणजे कांबळेने केवळ आपली ओळख बदललेली नव्हती, तर तो ‘सुनिल जगताप सर’ या नावाने आदिवासी भागात कार्यरत होता. २०१८ मध्ये ‘उलगुलान – एव्हरीडे हिरो’ या युट्यूबवर प्रदर्शित झालेल्या शॉर्ट फिल्ममध्ये तो झळकलेला आहे. ( Maoist activistLaptop appears as hero in short film !)

या तीन मिनिटांच्या डॉक्युमेंटरी शैलीतील शॉर्ट फिल्ममध्ये तो ‘सुनिल जगताप’ म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी झटणारा समाजसेवक म्हणून दाखवला आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात तो मुलांना शिक्षण, कला आणि समाजप्रबोधन यासाठी मदत करत असल्याचं चित्रण आहे. ही फिल्म ‘उलगुलान’ या नावाने १० मार्च २०१८ रोजी युट्यूबवर पोस्ट करण्यात आली होती. ती अजूनही उपलब्ध आहे.

ही फिल्म इतकी काळ उघडपणे युट्यूबवर असतानाही तपास यंत्रणांना त्याची माहिती नव्हती. प्रशांत कांबळे या नावाखाली शोध सुरू असतानाही ‘सुनिल जगताप’ नावाने तो स्वतंत्र ओळख घेऊन खालापूरमधील आदिवासी भागात मुक्तपणे फिरत होता आणि जनसंपर्क वाढवत होता.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कांबळे हा माओवादी चळवळीशी २०००च्या दशकाच्या सुरुवातीपासून संबंधित होता. २००९ पासून तो फरार होता आणि त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी हिंसक कृत्यांशी संबंध असल्याचे आरोप आहेत. पुणे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याला यंदा अटक केली. अटक केल्यानंतर त्याने स्वीकारले की तो ‘सुनिल जगताप’ या नावाने सामाजिक कार्य करत होता.

प्रशांत कांबळेला ‘लॅपटॉप’ हे कोडनेम मिळाले कारण तो माओवादी संघटनेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाशी संबंधित होता. ई-मेल, डेटा कलेक्शन, इन्क्रिप्टेड संवाद यामध्ये तो पारंगत होता. यामुळे तो संघटनेचा ‘टेक्निकल ब्रेन’ म्हणून ओळखला जात होता.

सध्या प्रशांत कांबळे पुण्यात न्यायालयीन कोठडीत असून त्याच्याविरोधात राज्य व केंद्र सरकारच्या विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास यंत्रणा आता त्याच्या खालापूरमधील कार्यकाळातील लोकसंपर्क, फिल्मच्या निर्मात्यांसोबतचा संबंध, आणि त्याच्या सहाय्यकांच्या तपशीलांची चौकशी करत आहेत.

प्रशांत कांबळे हा पुण्याचा रहिवासी होता. ताडीवाला रोड वस्तीत तो राहायचा. तो संगणक आणि लॅपटॉप दुरुस्ती करीत असे. कांबळे सांस्कृतिक संघटना कबीर कला मंचच्या संपर्कात आला होता. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०१० ला मुंबईला कामासाठी जात असल्याचे सांगून तो घरातून निघून गेला. मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. त्याच्या कुटुंबाने १८ जानेवारी २०११ रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली.

प्रशांत कांबळे आणि संतोष शेलार हे दोघे पुण्यातून बेपत्ता झाले. दोघेही गडचिरोलीच्या जंगलात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) संघटनेचे सक्रिय सदस्य झाल्याचे समोर आले होते. दोघांनीही माओवाद्यांचा सर्वोच्च नेता मिलिंद तेलतुंबडे सोबत काम केल्याचे तपासात निष्पन्न झाले. नोव्हेंबर २०२१ मध्ये गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे मारला गेला. तसेच आजारी पडल्याने संतोष शेलार जानेवारी २०२४ मध्ये पुण्यात घरी आला. त्यावेळी दहशतवाद विरोधी पथकाने त्याला अटक केली.