विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्य प्रदेशातील मंत्र्यांमध्ये वादग्रस्त विधानांची जणू स्पर्धा लागली आहे. उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांनी केलेल्या एका विधानामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे अगोदरच अडचणीत आले आहेत. ( Controversial statements from ministers in Madhya Pradesh, now Deputy Chief Minister is under fire)
जबलपूर येथे नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला संबोधित करताना देवदा म्हणाले, संपूर्ण देश, देशाचे सैन्य आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहेत. पहलगाम येथे गेलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारले याचा मनात खूप राग होता. त्या दिवसापासून संपूर्ण देशात तणाव निर्माण झाला. जोपर्यंत याचा बदला घेतला जात नाही, तोपर्यंत आपण शांततेत श्वास घेऊ शकणार नाही, अशी भावना भारतीयांच्या मनात होती. मी पंतप्रधानांचे आभार मानू इच्छितो, त्यांच्या नेतृत्वात देशाने या घटनेचा बदला घेतला. संपूर्ण देश, देशाचे सैन्य, सैनिक त्यांच्या चरणी नतमस्तक आहेत.
या विधानानंतर देवरा यांच्यावर भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसने पक्षाच्या वतीने ‘X’ वर टीका करताना म्हटले आहे कि, देशाचे सैन्य आणि सैनिक पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक, असे मध्य प्रदेशातील भाजप सरकारचे उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांनी म्हटले आहे. जगदीश देवदा यांचे हे विधान खूपच लज्जास्पद आहे. हा सैन्याच्या शौर्याचा आणि धाडसाचा अपमान आहे. आज संपूर्ण देश सैन्यासमोर नतमस्तक होत आहे, तेव्हा भाजप नेते आपल्या शूर सैन्याबद्दल वाईट विचार व्यक्त करत आहेत. भाजप आणि जगदीश देवदा यांनी माफी मागावी. त्यांना पदावरून काढून टाकले पाहिजे.
