संजय राऊत यांची ‘पुस्तक डिप्लोमसी’: बाळासाहेबांनी मोदी-शहा यांना मदत केल्याचा ‘ वास्ता ‘ देत उद्धव ठाकरे यांना वाचविण्याचा प्रयत्न!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या अडचणीत आले आहेत. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पक्षाचे शिलेदार सोडून चालले आहेत. मुलगा आदित्य ठाकरे याच्यावर दिशा सालियन प्रकरणात अटकेची टांगती तलवार आहे. यातून उद्धव ठाकरे याना वाचविण्यासाठी त्यांचे खासदार संजय राऊत यांनी पुस्तक डिप्लोमसी द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा याना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मदतीचा वास्ता देत उद्धव ठाकरे यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. (Sanjay Raut’s ‘Book Diplomacy’: Attempt to save Uddhav Thackeray by reminding that Balasaheb helped Modi-Shah!)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या नव्या पुस्तकाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या विधानामागे पुस्तकात मांडलेली रणनीती, म्हणजेच ‘पुस्तक डिप्लोमसी’, अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. पुस्तकात ‘राजा का संदेश साफ है’ या प्रकरणात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सुरुवातीच्या राजकीय संघर्षांची, विशेषतः गुजरात दंगलीनंतर आलेल्या संकटांची माहिती दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की, त्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी दोघांनाही संकटातून बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

गुजरात दंगलीनंतर अमित शहा यांच्यावर सीबीआयचा ससेमिरा होता आणि त्यांना तडीपार करण्यात आले होते. त्यावेळी शहा आपल्या मुलासह मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांची मदत मागण्यासाठी आले होते. बाळासाहेबांनी एका फोनवर त्यांच्या अडचणी दूर केल्या, असा दावा राऊत यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना अटक होऊ नये यासाठी शरद पवारांनी केंद्रीय कॅबिनेटमध्ये भूमिका मांडल्याचाही उल्लेख आहे. मोदींना वाचवण्यासाठी शरद पवारांनी कशी सूत्रं हलवली, याची सविस्तर माहितीही पुस्तकात आहे.

या सगळ्या दाखल्यांमधून संजय राऊत हे अप्रत्यक्षपणे असा संदेश देत असल्याचे स्पष्ट होते की, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी-शहा यांना संकटातून वाचवले, त्याच ठाकरे घराण्याशी विशेषतः उद्धव ठाकरे यांच्याशी नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी अन्याय केला आहे. शहांनी ज्यांनी मदत केली, त्यांच्याशी आज ‘निर्घृणपणे’ वागल्याचा आरोप संजय राऊतांनी या पुस्तकात केला आहे. आता उद्धव ठाकरे चोहोबाजूने संकटात आहेत. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी केलेल्या मदतीचा वास्ता दिला तर मोदी आणि शहा ठाकरे यांच्याबाबत फार कठोर भूमिका घेणार नाहीत असा विचार राऊत यांनी केल्याचे बोलले जात आहे.

या ‘पुस्तक डिप्लोमसी’द्वारे संजय राऊत उद्धव ठाकरे यांची प्रतिमा सावरण्याचा आणि ठाकरे घराण्याच्या ऐतिहासिक योगदानाची आठवण करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अजूनही उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाचा आधार घ्यावा लागत असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

 

 

#marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #mumbai #marathi #marathinewsvideos #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *