विशेष प्रतिनिधी
नागपूर : सरकारी काम अन् सहा महिने थांब ही म्हण सत्यात उतरलीच होती. पण नागपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनता दरबाराने प्रशासनाच्या दिरंगाईला चाप बसवला. नागरिकांनी पाच वर्षांपासून पाठपुरावा केलेल्या अनेक प्रकरणांत अखेर न्याय मिळाला आहे. कुणाच्या घरात वीज आली, कुणाचा रस्ता मंजूर झाला, तर कुणाच्या जमिनीवर डोळ्यादेखत अतिक्रमण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल झाला. ( Justice was received in the court of the Chief Minister the five-year wait was finally over.)
नागपूरच्या हैदराबाद हाऊस (सिव्हिल लाइन्स) येथे पार पडलेल्या जनता दरबारात मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ५८१ तक्रारी ऐकून घेतल्या. शिक्षक, निवृत्त कर्मचारी, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांनी आपल्या समस्या मांडल्या. काही तक्रारींवर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. महिन्याभराच्या आत यातील २०८ अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाली असून, ९८ प्रकरणांमध्ये संबंधित विभागांनी तक्रारदारांशी संपर्क साधून उत्तर दिले, अशी माहिती सचिवालयाने दिली.
वांजरा (भिलगाव मागं) येथील कमलेश हिरेखण यांचे घर आणि परिसर पाच वर्षांपासून अंधारात होते. दूरवरच्या खांबावरून वीज आणली जात होती, पण वारंवार वीज खंडित होत होती आणि अपघाताचा धोका वाढत होता. त्यांनी सातत्याने प्रशासन दरबारी धाव घेतली होती. अखेर मुख्यमंत्र्यांच्या दरबारात समस्या मांडताच एक महिन्याच्या आत वीजेचे खांब बसवले गेले आणि वीजपुरवठा सुरळीत झाला.
नलिनी बुटे यांच्या स्वावलंबीनगरमधील १६ हजार चौरस फुटांच्या प्लॉटवर बांधकाम व्यावसायिकाने करार केला होता – १४ फ्लॅट व १ कोटी रुपये देण्याचे आश्वासन होते. मात्र, केवळ ४५ लाख रुपये देऊन उरलेले पैसे आणि फ्लॅट्स न देता फसवणूक झाली. पाच वर्षांपासून कार्यालयांच्या फेऱ्या मारल्या, पण न्याय मिळत नव्हता. अखेर मुख्यमंत्री दरबारात हा प्रश्न मांडल्यावर प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. “करारातील सर्व अटी पूर्ण व्हाव्यात,” अशी मागणी बुटे यांनी ‘मटा’शी बोलताना केली.
अजूनही काही प्रकरणांवर प्रक्रिया सुरू असून, काही समस्या धोरणात्मक स्वरूपाच्या असल्यामुळे त्या मुंबई कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती सचिवालयाने दिली. जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्रत्यक्ष प्रतिसाद मिळत असल्याने अनेकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
