सर्वपक्षीय शिष्टमंडळ भारताची भूमिका जागतिक व्यासपीठावर मांडणार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बांगलादेश युद्धाच्या काळात १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांना संयुक्त राष्ट्र संघात भारताची भूमिका मांडण्यासाठी पाठवले होते. त्यांच्या प्रभावी भाषणाने भारताच्या बाजूने जागतिक जनमत तयार झाले. आज, ५२ वर्षांनंतर, त्याच धर्तीवर केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशाच्या दहशतवादविरोधी भूमिकेचे समर्थन जागतिक स्तरावर करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची घोषणा केली आहे. (All-party delegation to present Indias position on the global platform )

या शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेसचे खासदार डॉ. शशी थरूर करणार असून, त्यात भाजप, काँग्रेस, डीएमके, जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे प्रतिनिधी सहभागी आहेत. हे शिष्टमंडळ अमेरिका, ब्रिटन, कतार, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमीरात या प्रमुख राष्ट्रांचा दौरा करणार असून, २२ मेपासून त्याचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

या शिष्टमंडळात शशी थरूर (काँग्रेस), रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा (भाजप), संजय कुमार झा (जदयू), कनीमोई करुणानिधी (DMK), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) आणि श्रीकांत शिंदे (शिंदेसेना) यांचा समावेश आहे. याबाबत माहिती देताना संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले, “भारत कधीही दहशतवाद सहन करत नाही. राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन आपण आता एकसंधपणे जगासमोर उभे राहतो आहोत. आज संपूर्ण देश एका आवाजात बोलतोय. राजकीय मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रीय एकात्मता दाखवण्याची ही वेळ आहे.

जागतिक स्तरावर भारताची भूमिका ठामपणे मांडणे, पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा पर्दाफाश करणे, भारताने अलीकडे घेतलेल्या लष्करी पावलांचे नैतिक समर्थन मांडणे, आणि भारताविरोधातील दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला प्रत्युत्तर देणे हा दौऱ्याचा उद्देश आहे. शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य राष्ट्रांनाही भेट देणार असून, भारताच्या नागरी वस्त्यांवर झालेल्या हल्ल्यांची माहितीही या दौऱ्यात मांडली जाणार आहे.

या महत्त्वाच्या शिष्टमंडळात प्रतिनिधित्व मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिष्टमंडळात माझा समावेश झाल्याचा मला अभिमान आहे. ही जबाबदारी मी विनम्रतेने स्वीकारते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री किरण रिजिजू आणि परराष्ट्र विभागाचे मन:पूर्वक आभार मानते,” असे त्या म्हणाल्या.

या दौऱ्यामुळे १९७१ च्या ऐतिहासिक क्षणाची पुनरावृत्ती होणार असून, भारताची भूमिका जागतिक व्यासपीठावर अधिक प्रभावीपणे पोहोचवली जाणार आहे. ही केवळ कूटनीती नव्हे तर भारताच्या राजकीय एकतेचे प्रतीक ठरणार आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांना संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) भारताची भूमिका मांडण्यासाठी पाठवले होते. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणात बांगलादेशातील मानवी हक्कांचे उल्लंघन, पाकिस्तानी लष्कराचे अत्याचार, आणि भारताची नैतिक व घटनात्मक भूमिका ठामपणे मांडली होती.