शिष्टमंडळावरून वाद : संजय राऊत, काँग्रेसला शरद पवारांच्या कानपिचक्या

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जागतिक पातळीवर भारताची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेमण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी या शिष्टमंडळावर टीका केली असून, काँग्रेसनेही या निवडीवर आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही पक्षांना कानपिचक्या दिल्या आहेत. ( Controversy over delegation Sanjay Raut Congress scolded by Sharad Pawar)

संजय राऊत म्हणाले, “हे पक्षाच्या निर्णयावर आधारित नसते. मी स्वतः अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाचा सदस्य होतो. आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा करताना पक्षीय भूमिका घेणे योग्य नाही. आज सरकारने जी शिष्टमंडळ तयार केली आहे, ती देशाची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी आहे. पण असं वाटतं की काही सदस्य फक्त त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तिथे जात आहेत. स्थानिक राजकारण यामध्ये आणू नये ही आमची भूमिका आहे.”

दुसरीकडे काँग्रेसने शिष्टमंडळात शशी थरूर यांना प्रमुख केल्याने विरोध दर्शवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, थरूर यांची निवड पक्षाच्या संमतीशिवाय झाली आहे. यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जगाच्या पटलावर भारताची बाजू प्रभावीपणे मांडणे हे प्रत्येक पक्षाचे कर्तव्य आहे. कोणतीही संकुचित राजकीय भूमिका न घेता देशहितासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे या वादात पडण्याची गरज नाही.”

शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या शशी थरूर यांच्यावरून उठलेला वाद, संजय राऊत यांचा अप्रत्यक्ष विरोध, आणि काँग्रेसचा थेट आक्षेप यामुळे हा विषय चांगलाच गाजू लागला आहे. परंतु शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्याच्या हस्तक्षेपामुळे हा वाद निवळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याबाबत म्हणाले, शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे कान टोचले आहेत.
संजय राऊत आणि त्यांची टीम उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे राहुल गांधी हे सैनिकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. सैनिक देशाचा संरक्षण करताना त्यावर राजकारण करण्याचं काम करत आहे.त्यांना शरद पवार यांनी सूचना दिल्यात. ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या सूचना महाविकास आघाडीचे नेते ऐकतील असा विश्वास आहे.

-भारत पाकिस्तान युद्धाचा विजयाचा जल्लोष कोणीच केलेला नाही, सैनिकांचे प्रोत्साहन वाढवणे त्यांचा अभिनंदन करण्यासाठी, दहशतवाद्याचा संपवण्याचा काम पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्याच्या माध्यमातून करत असताना,त्यांच्या पाठीशी उभ राहिला पाहिजे यासाठी तिरंगा यात्रा काढत आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर हे सरकार मध्ये नाही आहे किंवा सरकारच्या मंत्रीपदावरही नाहीये, त्यामुळे त्याना माहिती नाही. पण सरकार प्रत्येक गोष्टी उघड करत नाही, दहशतवादाविरोधात कारवाई करताना बऱ्याच गोष्टी या गुप्त ठेवाव्या लागतात, संरक्षण संबंधित माहिती त्या ठिकाणी गोपनीय ठेवावी लागते, दहशतवादांना संपवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी वर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.