बंगळुरूत १२ तासांत १३० मिमी पावसाची नोंद; विजेचा शॉक, भिंत कोसळून तिघांचा मृत्यू; ५०० घरे जलमय

विशेष प्रतिनिधी |

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी आणि भारताची ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हणून ओळख असलेले बंगळुरू शहर मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घालते आहे. रविवारी (१८ मे) सायंकाळी सुरू झालेला पाऊस सोमवारी (१९ मे) पहाटेपर्यंत सुरू राहिला. या अवघ्या १२ तासांत शहरात तब्बल १३० मिमी पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५०० हून अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत. ( Bengaluru records 130 mm of rain in 12 hoursThree killed due to electric shockwall collapse 500 houses flooded)

शहरातील टोनी, इंदिरानगर, व्हाइटफील्ड, कोरमंगळा, डॉलर्स कॉलनी यांसारख्या अनेक पॉश आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये रस्ते जलमय झाले असून अंडरपास व उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. परिणामी, शहरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. BMTC (बंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) च्या अनेक बससेवा पावसामुळे बंद पडल्या आहेत.

भारतीय हवामान विभागानुसार, बंगळुरूमध्ये कमी दाबाच्या दोन प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे शहराच्या दक्षिण, उत्तर व पूर्व भागात वादळासह मुसळधार पाऊस झाल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील पाच दिवसही जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बंगळुरू महानगरपालिकेचे मुख्य आयुक्त महेश्वर राव यांनी स्पष्ट केले की, या १२ तासांत पडलेला पाऊस हा “गेल्या दशकातील दुसऱ्या क्रमांकाचा उच्च पावसाचा विक्रम” आहे.

या पावसात डॉलर्स कॉलनीमधील मधुवना अपार्टमेंटमध्ये पाणी उपसताना विजेचा धक्का बसून दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६३ वर्षीय मनमोहन कामथ व १२ वर्षीय दिनेश यांचा समावेश आहे. कामथ यांनी पहिल्या मजल्यावरील घरातून पाणी उपसण्यासाठी मोटार वापरली होती. सुरक्षारक्षकाचा मुलगा दिनेश मदतीला गेला असता मोटार सुरु करताच दोघांनाही जोरदार विजेचा धक्का बसला. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. विशेष बाब म्हणजे दिनेश फक्त तीन महिन्यांपूर्वी नेपाळहून आपल्या कुटुंबासोबत बंगळुरूत स्थलांतरित झाला होता.

याशिवाय, व्हाइटफील्ड भागातील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या ३२ वर्षीय हाऊसकीपिंग कर्मचारी शशिकला डी यांचा भिंत कोसळून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, परिस्थितीचा विचार करता बंगळुरू दक्षिणचे खासदार पी. सी. मोहन यांनी इन्फोसिससह शहरातील सर्व IT कंपन्यांना दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करण्याचे आवाहन सोशल मीडियावरून केले आहे. अनेक IT कंपन्यांनी यास प्रतिसाद देत घरून कामाची घोषणा केली आहे.

सध्या शहर प्रशासन, महापालिका, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागांनी मदतकार्य सुरू केले असून जलमय भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे.

शहरवासीयांनी गरज नसताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.