टीकेचे बाण चालविणारे संजय राऊत पडले एकटे ; ठाकरे गटाचा सर्वपक्षीय शिष्टमंडळाला पाठिंबा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्र सरकारने पाकिस्तानच्या कुरापतींविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर टीका करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आता स्वतःच आपल्या पक्षाच्या भूमिकेमुळे अडचणीत सापडले आहेत. कारण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने अधिकृतपणे या शिष्टमंडळाला पाठिंबा जाहीर केला असून, देशहितासाठी आवश्यक ती भूमिका घेण्याची ग्वाही केंद्र सरकारला दिली आहे.

( Sanjay Raut who was firing arrows of criticism fell aloneThackeray group supports all-party delegation)

ठाकरे गटाने त्यांच्या अधिकृत पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संवादात शिष्टमंडळ राजकीय नसून दहशतवादविरोधी असून भारताच्या सुरक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हे लक्षात घेतल्यानंतर ठाकरे गटाने या शिष्टमंडळाला पाठिंबा देत, देशासाठी जे काही आवश्यक आहे ते करण्याची तयारी दर्शवली आहे. खासदार प्रियंका चतुर्वेदी या शिष्टमंडळाचा भाग असतील.

पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकमताने दहशतवादाविरोधात भूमिका घेतली आहे. ठाकरे गटानेही या पार्श्वभूमीवर स्पष्ट केले आहे की, पाक पुरस्कृत दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येणे ही काळाची गरज आहे.

मात्र, ठाकरे गटाने हेही स्पष्ट केले आहे की, पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या घटनांबाबत गुप्तचर यंत्रणा व सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींविषयी सरकारला प्रश्न विचारले जात राहतील. केंद्र सरकारने यावर खुल्या चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अशा शिष्टमंडळांच्या बाबतीत केंद्र सरकारने अधिक पारदर्शकता ठेवावी व सर्व संबंधित पक्षांना योग्य त्या प्रोटोकॉलनुसार माहिती द्यावी, अशी सूचनाही ठाकरे गटाने केंद्राला दिली आहे.

“दहशतवादाविरोधात आम्ही सर्व एकजूट आहोत. देशाच्या हितासाठी आम्ही कोणत्याही प्रयत्नाला साथ देऊ. जयहिंद!” अशा शब्दांत ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट करत संजय राऊत यांच्याच आधीच्या टीकेला छेद दिला आहे.