नक्षलविरोधी लढ्यात ऐतिहासिक यश; सीपीआय (माओवादी) चा महासचिव नाम्बाला केशव राव उर्फ बसवराजू ठार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात आज झालेल्या ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’मध्ये देशाच्या नक्षलविरोधी लढ्याला ऐतिहासिक यश लाभले आहे. सुरक्षा दलांनी सीपीआय (माओवादी) संघटनेचा महासचिव आणि नक्षल चळवळीचा मास्टरमाईंड समजला जाणारा नाम्बाला केशव राव उर्फ बसवराजू याला ठार केले आहे. त्याच्यासह एकूण २७ नक्षलवादी मारले गेले आहेत. ( Historic success in anti-Naxal fight CPI (Maoist) General Secretary Nambala Keshav Rao alias Basavaraju killed )

माओवाद्यांचा सर्वोच्च नेता मारला जाण्याचा भारताच्या गेल्या तीन दशकांतील नक्षलविरोधी कारवाईतील पहिलाच प्रसंग आहे. बसवराजू हा नक्षल चळवळीचा “टॉप कमांडर” आणि संघटनेचा “थिंक टँक” मानला जात होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महत्त्वपूर्ण कारवाईबद्दल ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, “आपल्या सुरक्षा दलांच्या या उल्लेखनीय यशाचा अभिमान आहे. माओवादाचा संपूर्ण नाश करून देशातील जनतेला शांतता आणि प्रगतीचे जीवन मिळावे, यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये ५४ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून ८४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

भाजप सरकारने नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे, आणि त्या दिशेने आमचा निर्णायक पुढाकार सुरु आहे.
ही कारवाई म्हणजे केवळ एका संघटनेवरचा प्रहार नसून, नक्षलवाद्यांच्या संपूर्ण नेटवर्कवर जबरदस्त धक्का आहे, असे ते म्हणाले.

बसवराजूचा मृत्यू ही नक्षल चळवळीसाठी मोठी धक्का बसणारी घटना आहे. तो जंगलात गुप्त हालचालींचे नियोजन, शस्त्रसाठा व्यवस्थापन आणि हिंसाचार पसरवण्याच्या रणनीती आखणाऱ्या मुख्य नेत्यांपैकी एक होता.

या कारवाईनंतर नक्षल चळवळीत भीती आणि गोंधळाचे वातावरण आहे. केंद्र सरकारच्या ‘एक राष्ट्र – एक धोरण’च्या अंतर्गत आता या चळवळीच्या उरल्या-सुरल्या भागांवरही निर्णायक कारवाई होणार आहे.