धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन, छगन भुजबळ यांची स्पष्ट भूमिका

विशेष प्रतिनिधी

नाशिक : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजीनामा देणारे माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांना जर या प्रकरणात क्लीनचिट मिळाली, तर मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईन, अशी भूमिका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंडळी आहे. ( If Dhananjay Munde gets a clean chitI will resign from the ministerial post Chhagan Bhujbals clear stand)

भुजबळ सध्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदावर आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतली होती. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना भुजबळ म्हणाले, “उद्या जर धनंजय मुंडेंना सर्व आरोपांतून निर्दोष ठरवून क्लीनचिट मिळाली, तर मी स्वतःहून मंत्रीपदाचा राजीनामा देईन. त्यांच्या पुनर्नियुक्तीला माझी कोणतीही हरकत नाही.धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परत आले तर माझी भूमिका अडथळा ठरणार नाही. मात्र, एकाच पदावर दोन व्यक्ती राहू शकत नाहीत, म्हणून मी बाजूला होईन.”

मुलाखतीत विचारण्यात आले की, “या बदलाबाबत पक्षांतर्गत कोणती चर्चा झाली होती का?”, त्यावर भुजबळ म्हणाले, “चर्चा झाली किंवा नाही, याचा फरक नाही. राजीनाम्याचा निर्णय माझा स्वतःचा असेल.
महायुती सरकार स्थापन होताना छगन भुजबळ यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत होते. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. नाशिकमधून माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवळ यांना मंत्रिपद मिळाले, त्यामुळे भुजबळ नाराज होते. त्यांनी ही नाराजी जाहीरपणेही व्यक्त केली होती.

याच काळात बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर गंभीर आरोप झाले. त्यानंतर राजकीय दबाव वाढल्याने मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या रिक्त जागेवर भुजबळांची वर्णी लागली आणि त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली.