गडचिरोलीतील 100 अंगणवाड्यांचे नंदघरमध्ये रूपांतर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचे ‘नंदघर’मध्ये रूपांतर करण्याचा अभिनव उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. या नंदघरांमध्ये ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध असणार असून, सकाळच्या सत्रात बालकांना शिक्षण आणि पोषण साहाय्य मिळेल. दुपारी महिलांसाठी आरोग्य व उद्योजकतेसंदर्भातील जनजागृती कार्यक्रम राबविले जातील. ( 100 Anganwadis in Gadchiroli converted into NandgharInnovative initiative from the concept of Chief Minister Devendra Fadnavis)

या उपक्रमासाठी महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली आणि वेदांत ग्रुपच्या अनिल अग्रवाल फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU) झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि नंदघरचे सीईओ शशी अरोरा यांच्या उपस्थितीत हा करार झाला.

या प्रकल्पाअंतर्गत 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना शिक्षण, पोषण आणि आरोग्य सेवांचा लाभ दिला जाणार आहे. याशिवाय 0 ते 6 वर्षे वयोगटातील 3,867 बालके, 602 गर्भवती व स्तनदा माता, तसेच 1,134 किशोरी मुलींना उद्योगाभिमुख प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

अंगणवाड्यांमध्ये बालमैत्रीय सजावट, रंगरंगोटी, एलईडी टीव्ही, टॅबलेटसारख्या ई-लर्निंग सुविधा, पाणी, स्वच्छतागृह, वीज आणि आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविकांसाठी ई-लर्निंग व आरोग्य प्रशिक्षण देण्यात येईल, तसेच आशा वर्कर्स व एएनएम यांनाही आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रकल्पासाठी जिल्हा परिषद समन्वयक म्हणून काम करेल. अंगणवाड्यांची यादी देणे, नोडल अधिकारी नेमणे, ब्रँडिंग व देखभाल करणे ही कामे ती पार पाडणार आहे. याशिवाय, अंमलबजावणी व देखरेखीसाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारामुळे गडचिरोली जिल्ह्यात सर्वांगीण विकासाला गती मिळत असून, हा उपक्रम त्यांच्या दूरदृष्टीचा व संवेदनशीलतेचा प्रतीक आहे. भविष्यात हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्याचा शासनाचा मानस आहे.