विशेष प्रतिनिधी
भंडारा : भाजपचे विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्र विधानसभेसंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. मात्र, महाराष्ट्राचे खरे ‘पप्पू’ हे नाना पटोले आहेत. त्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे,” अशा उपरोधिक शब्दांत फुके यांनी टोला लगावला. ( Maharashtras Pappu Nana Patolech BJP MLA Parinay Phukes tola rejects Congress allegations)
भंडाऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फुके म्हणाले, “लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत मतदानाची टक्केवारी वाढली यामागे हवामान, जनजागृती आणि निवडणुकीसंदर्भातील जनतेची जागरूकता यांसारखी अनेक कारणे आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत उन्हाळ्यामुळे मतदार थोड्या प्रमाणात बाहेर पडले. त्यामुळे काही ठिकाणी चुकीचे उमेदवार निवडले गेले. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत मतदार अधिक सजग झाले आणि सहा वाजल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर मतदान झाले.”
काँग्रेसने शिर्डी मतदारसंघातील मतदारयादीत ७ हजार मतदार वाढवल्याचा आरोप केला होता. या आरोपावर उत्तर देताना फुके म्हणाले, “फक्त आरोप करून काही सिद्ध होत नाही. काँग्रेसकडे खरोखरच काही ठोस पुरावे असतील तर ते निवडणूक आयोगाकडे सादर करावेत. अन्यथा ही एक प्रकारची जनतेची दिशाभूल आहे. भाजपने कधीही बोगस मतदानाला प्रोत्साहन दिलेले नाही. उलट काँग्रेसच निवडणूक निकाल पाहून हताश झाली आहे आणि त्यामुळे त्यांनी ‘ईव्हीएम’पासून मतदार यादीपर्यंत सर्व गोष्टींवर शंका घेण्याची सवय लावून घेतली आहे.”
नाना पटोले यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर “ते निवडणूक आयोगाचे वकील आहेत का?” असा सवाल केला होता. यावर प्रतिक्रिया देताना फुके म्हणाले, “भाजप हा एक जबाबदार पक्ष आहे. निवडणूक आयोग देशातील सर्वोच्च निवडणूक संस्था आहे. त्यावर अविश्वास दाखवणे म्हणजे लोकशाहीवरच अविश्वास दाखवण्यासारखे आहे. भाजपने निवडणूक आयोगाची बाजू मांडलेली नाही, तर देशाच्या संस्थांवरचा विश्वास टिकवण्याचा प्रयत्न केला आहे.”
फुके म्हणाले की, “काँग्रेसच्या ‘मत चोरण्याच्या’ थोतांडावर जनतेने निवडणुकीत विश्वास ठेवलेला नाही. युतीच्या उमेदवारांना भरघोस मतदानाने विजयी करून जनतेने विकासाला कौल दिला आहे. काँग्रेसच्या हताशतेतून हे आरोप आहेत, यात तथ्य नाही.”
