आघाडी पणाला लावून लोकसभेसाठी उमेदवारी देणाऱ्या चंद्रहार पाटील यांनीही ठाकरेंना सोडले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील जागेसाठी प्रचंड आग्रह करत पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडी पणाला लावली होती. आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा विरोध असतानाही अट्टाहासाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र आता हेच चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे यांना रामराम ठोकत शिंदे गटात दाखल होणार असल्याची घोषणा झाली आहे.
( Chandrahar Patil who had contested for the Lok Sabha by risking his alliance also left Thackeray.)

काही दिवसांपूर्वीच मंत्री संजय शिरसाट यांनी चंद्रहार पाटील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी मात्र पाटील यांनी ‘अधिकृत भूमिका घेतलेली नाही’ असे सांगत सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता त्यांनी थेट फेसबुक पोस्ट करून सरकारसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी राज्यातील क्रीडा क्षेत्रातील गैरप्रकार, अडचणी आणि त्रुटींविषयी भाष्य करताना असे म्हटले आहे की, राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना, बऱ्याच त्रुटी, अडचणी, गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. या समस्यांवर शासनाच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय उपाय निघू शकत नाही. त्यामुळे मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी शासनाच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.”

३० मे रोजी सांगलीच्या भाळवणीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चंद्रहार पाटील यांनी मंत्री सामंत यांना चांदीची गदा भेट दिली होती. त्यानंतरच त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले होते. आता शिरसाट यांनी जाहीर केले आहे की, ९ जून रोजी चंद्रहार पाटील शिंदे गटात औपचारिक प्रवेश करणार आहेत.

विशेष म्हणजे, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीही देण्यात आली होती. सांगलीतून काँग्रेसच्या विशाल पाटील यांचा दावा असतानाही उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना ही जागा त्यांना दिली. काँग्रेसचे नेते आणि शरद पवारांनीही या बाबत मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. त्यामुळे विशाल पाटील यांना अपक्ष लढावे लागले. त्यांनी विजय मिळवला, तर चंद्रहार पाटील यांचे डिपॉझिटही जप्त झाले.