ज्यांची उरली नाही पत, ते व्यक्त करतायत आपले मत, गिरे तो भी टांग उपर म्हणत एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

ठाणे : देशात ज्यांची उरली नाही पत, ते व्यक्त करतायत आपले मत असे म्हणत राहुल गांधी यांचे विधान म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा मानसिकतेचे उदाहरण आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ( Those who have no credit left they are expressing their opinion Gire To Bhi Tang UparEknath Shindes attack on Rahul Gandhi)

शिंदे म्हणाले की, “राहुल गांधी यांनी आपल्या लेखात विधानसभा निवडणुकीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची ‘भारत जोडो’ यात्रा राज्यात देखील येऊन गेली. मात्र येथील जनतेने त्यांना साथ दिली नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत आरक्षण जाणार, संविधान बदलणार असे फेक नेरेटिव्ह पसरवून त्यांचे जास्त खासदार निवडून आले. तेव्हा मात्र त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतले नाही. तेव्हा मतदार बरोबर होते. निवडणूक आयोग बरोबर होता. मात्र त्यानंतर महायुती सरकारने सावध होत व्यवस्थित नियोजन केले. फेक नेरेटिव्ह पसरत असेल तर ते वेळोवेळी खोडून काढले. गेली अडीच वर्षे सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणी लाडके भाऊ त्यांनी महायुती सरकारला साथ दिली. त्याबळावर महायुतीला लँड स्लाईड मतांचे दान मिळाले. मात्र आज काहीजण त्यावर आक्षेप घेत आहेत.

एकीकडे परदेशात जाऊन आरक्षण जाईल म्हणायचे, देशाची बदनामी करायची, ऑपरेशन सिंदूरबाबत प्रश्न निर्माण करून संभ्रम निर्माण करायचा आणि आता पारदर्शकपणे राबवलेल्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घ्यायचा हे सर्वस्वी चुकीचे आहे. त्यामुळे अशाप्रकारे आरोप करणाऱ्यांना जनता विसरणार नाही उलट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष उरलासुरला जनादेश देखील गमावून बसेल अशी टीकाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

“आज काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून वारंवार फेक नॅरेटिव्ह तयार करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातो. कधी ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न, कधी भारताच्या लोकशाहीवर टीका, कधी परदेशात जाऊन देशाची प्रतिमा मलिन करणं हे सर्व आघाडीचे नेते करत आहेत,” असा आरोपही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला