विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : “राहुल गांधी यांचा बहुतांश वेळ परदेशात जातो, त्यामुळे देशातील राजकीय परिस्थिती समजून घ्यायला त्यांना वेळ लागतो,” अशा शब्दांत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.
(Spending more time abroad takes time to understand domestic
politics Radhakrishna Vikhe-Patil attacks
Rahul Gandhi)
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 निवडणुकीवर लेख लिहून निवडणूक प्रक्रियेवर संशय घेतला. यावर उत्तर देताना विखे-पाटील म्हणाले की, “राहुल गांधींच्या विधानांचा मतदारांवर आणि संपूर्ण लोकशाही प्रक्रियेवर अपमानकारक प्रभाव पडतो. राहुल गांधी केवळ निवडणूक प्रक्रियेबाबत गैरसमज पसरवत आहेत. मागील दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जेमतेम ४० जागा जिंकली होती. यंदा १०० जागा झाल्या. मग हे फिक्सिंग नव्हते का? आंध्रप्रदेश आणि हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता आली ती सुध्दा फिक्सिंगमुळेच का? या प्रश्नांची उत्तरं राहुल गांधी यांनी द्यायला हवीत.
विखे-पाटील म्हणाले, “राहुल गांधी यांना देशातील राजकारण का समजत नाही, याचं कारण त्यांचा बहुतांश वेळ परदेशात जाण्यात जातो. जर त्यांनी भारतात वेळ दिला असता, तर त्यांना इथली राजकीय परिस्थिती समजली असती.”
राहुल गांधी केवळ स्वतःचीच नव्हे तर काँग्रेस पक्षाचीही बदनामी करत आहेत. “लोकसभा निवडणुकीत खोटं आख्यान पसरवण्यात आलं, काही ठिकाणी त्याचा परिणाम झाला, पण विधानसभा निवडणूक हे पूर्णपणे वेगळं राजकीय समीकरण होतं. जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला, असे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींच्या विधानाचे समर्थन करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही विखे-पाटील यांनी लक्ष्य केलं. त्यांनी म्हटलं, “संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यांकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही. सुप्रिया सुळे यांना स्वतःचं मत उरलेलं नाही. खासदार सुळे कधी लोकसभेत मांडलेल्या विधेयकांना पाठिंबा देतात, तर कधी चर्चेच्या वेळी अनुपस्थित राहतात. त्यांच्या वडिलांचं मोदींचं कौतुक करणं हा विरोधाभास अधोरेखित करतो. आता त्यांनी ठरवलं पाहिजे की आघाडीसोबत राहायचं की मोदींसोबत जावं.”
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “राहुल गांधी सातत्याने मतदारांचा अपमान करत आहेत. निवडणूक आयोगावर शंका घेणे, आकड्यांवर आधारित खोटे विश्लेषण करणे, आणि विरोधकांवर अकारण आरोप करणे हे त्यांचे प्रकार केवळ जनतेच्या निर्णयाला दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न आहेत.”
