विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुतीमध्ये निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि शिंदे गटातील आमदार आमनेसामने आले आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तर अजित पवारांवर थेट निशाणा साधला होता. मात्र आता त्यांची दिलजमाई झाली आहे. ( Ajit Pawar and Sanjay Shirsat had a dispute over the diversion of funds.)
शिंदे गट सामाजिक न्याय विभागासह आदिवासी कल्याणचा निधी वळल्यामुळे नाराज असल्याची चर्चा होती. त्यावरून वर्धापन दिनादिवशी भाषणामध्ये अप्रत्यक्षपणे शिंदे गटातील आमदारांवर अजित पवारांनी निशाणा साधला. “अजित पवार पैसे सोडत नाहीत, अशा बातम्या काही जण सोडतात. अजित पवार आपल्या खिशातून पैसे देतो का?” असे म्हणत टोला लगावला होता. यावरून स्वतः मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण देताना कोणतीही नाराजी नसल्याचे सांगितले. तसेच, अजित पवार यांच्या बोलणे झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली. त्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांच्यावर असलेल्या नाराजाच्या चर्चांचे खंडन केले. ते म्हणाले की, “अजित पवार सभेत मिश्कीलपणे बोलले असतील. आमची अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आता आमचे कोणतेही वाद नाहीत. जेव्हा एकमेकांशी संवाद होतो. त्यावेळी या वादाला अर्थ राहत नाही.” असे म्हणत त्यांनी नाराजींच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, यावेळी त्यांना मुंबई पालिकेत शिवसेना महायुतीमध्ये लढणार की, स्वबळावर लढणार? याबाबत विचारण्यात आले. यावर ते म्हणाले की, “यावर अद्याप आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. महायुती म्हणून एकत्र लढण्याची आमची मानसिकता आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील.
“मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आमचे चांगले मित्र आहेत. आमच्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आमच्यात कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल या बुद्धिस्ट स्थळाच्या विकास कामाच्या भूमिपूजन संदर्भात चर्चा झाली.” असे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले. त्यावर मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, “जयंत पाटील अनेक वर्षांपासून त्यांच्या पक्षात नाराज आहेत. त्यांच्या पक्षामध्ये त्यांची कोंडी होत असेल तर त्याबाबत काही कल्पना नाही. पण जयंत पाटील यांचे मन तिथे रमत नाही ही वस्तुस्थिती आहे.
