विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: ब्रिटनची बीबीसी ही वृत्तवाहिनी सातत्याने सरकारच्या विरोधात अजेंडा तयार करण्याचे काम करते. आता बीबीसीने
प्रयागराज येथे २०२५ च्या महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांची आकडेवारी शोध पत्रकारिता करून शोधल्याचा दावा केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्याचा आधार घेऊन उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.
( BBC report on the stampede at the Prayagraj Mahakumbh Mela and Rahul Gandhis tragic politics)
चेंगराचेंगरीत किमान ८२ लोकांचा मृत्यू झाला असून, सरकारने केवळ ३७ मृत्यूंचीच अधिकृत नोंद केली आहे, असा दावा बीबीसी या वृत्तवाहिनीने केला आहे.
या रिपोर्टवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, हा अहवाल दाखवतो की कुंभमधील मृत्यूंची आकडेवारी लपवली गेली, जशी कोविड काळात गरीबांच्या मृतदेह आकडेवारीतून गायब करण्यात आले. प्रत्येक मोठ्या रेल्वे अपघातानंतरही सत्य लपवलं जातं, हेच तर भाजप मॉडेल आहे. गरिबांची मोजदाद नाही, म्हणजे जबाबदारीही नाही!”
या वृत्तवाहिनीने आपल्या तपासात ११ राज्यांतील ५० हून अधिक जिल्ह्यांमध्ये जाऊन १०० हून अधिक कुटुंबांची भेट घेतली. या प्रवासात असं समोर आलं की मौनी अमावस्येच्या रात्री, २८-२९ जानेवारी दरम्यान, अमृतस्नानासाठी जमलेल्या हजारोंच्या गर्दीतून झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ८२ लोकांचा बळी गेला आहे.
सरकारच्या वतीने मात्र केवळ ३७ मृत्यूंचीच नोंद करण्यात आली आहे. या घटनेत ६० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, अति गर्दीमुळे रात्री १:३० ते २:०० दरम्यान बॅरिकेड तुटले आणि त्यातून ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जातं आहे.
