विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला धडा शिकविला. त्याचबराेबर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या दहशतवाद्यांना पाठिंबा जगासमाेर मांडून पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा टराटरा फाडण्यासाठी माेदी सरकारने सर्वपक्षीय खासदारांना पाठविले होते. आपली कामगिरी फत्ते करून मायदेशात परतले आहेत. या खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत या मोहिमेबद्दल वृत्तांत दिला आहे. पतप्रधानांनी त्यांचे काैतुक केले.
( PM praises all-party delegation for exposing Pakistans terrorism on international stage)
या मोहिमेत भाजपासह टीएमसी, काँग्रेसचे देखील खासदार होते. या खासदारांनी वेगवेगळ्या देशांत जात त्यांच्या राजधानीमध्ये पाकिस्तानने जन्माला घातलेला दहशतवाद आणि भारताची भूमिका मांडली. या प्रतिनिधीमंडळांनी आज मोदींना आपापले अनुभव सांगितले. सात प्रतिनिधीमंडळ देशोदेशी रवाना झाली होती. यामध्ये ५० खासदार होते. त्यांनी ३३ देशांच्या राजधानी आणि युरोपीय संघाचा दौरा केला. मोठ्या ताकदीने भारताने आपली बाजू जगासमोर मांडली. अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग होता आणि तो कमालीचा यशस्वी झाला आहे. पाकिस्तानला साथ देणाऱ्या देशालाही त्यांचे म्हणणे मागे घ्यावे लागले आहे. सातपैकी चार प्रतिनिधीमंडळांचे नेतृत्व सत्ताधारी एनडीएने तर तीन प्रतिनिधीमंडळांचे नेतृत्व विरोधकांनी केले होते. देशात कितीही विरोधात असले तरी सर्वजणांनी जगात एकी दाखविली आणि पाकिस्तानची झोप उडविली आहे. भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, जद(यू)चे संजय झा, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, द्रमुकच्या कनिमोळी आणि राष्ट्रवादी(सपा)च्या सुप्रिया सुळे यांनी आपापल्या शिष्टमंडळांचे नेतृत्व केले. या मोहिमेवरून परतल्यानंतर सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वर्धापन दिनासाठी महाराष्ट्रात आल्या होत्या. तो कार्यक्रम आटोपून त्या परत दिल्लीला मोदींची भेट घेण्यासाठी परतल्या. या प्रतिनिधीमंडळांमध्ये ओवोसींसारखा आक्रमक चेहरा देखील घेण्यात आला होता. ओवेसींनी पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात उघड भूमिका घेतली होती.
