विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागचा मास्टरमाईंड झिशान अख्तर याला कॅनडा पाेलीसांनी जेरबंद केले. लवकरच झिशानला भारतात आणले जाण्याची शक्यता आहे. झिशानला कॅनडात अटक झाल्याचे मुंबई पोलिसांनीही स्पष्ट केले आहे. ( Zeeshan Akhtar mastermind behind NCPs Baba Siddiquis murder jailed in Canada)
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बाबा सिद्दीकी यांची मुंबईत तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सिद्दीकी यांच्या पोटात आणि छातीत गोळी लागली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी करनैल सिंग आणि धर्मराज कश्यप नावाच्या दोघांना लगेचच अटक केली होती. पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील नकोदर येथील आकार गावचा रहिवासी असलेला झिशान अख्तरचा शोध सुरु होता. अख्तर हा बाहेरून या शूटर्सना सूचना देत होता.
झिशाननेच बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाची माहिती शूटर्सना दिली होती. यासोबतच मोहम्मद झिशानने आरोपींसाठी भाड्याने खोली घेण्यासोबत अनेक गोष्टींमध्ये मदत केली होती. सिद्दीकी हत्येवेळी तो परदेशात असल्याचे सांगितले जात होते. तिथूनच तो मारेकऱ्यांना सूचना देत होता. लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याला देखील कॅनडासोबतच्या प्रत्यार्पण करारानुसार भारतात आणण्यात आले आहे. झिशान अख्तर हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी संबंधित आहे. तो पुण्यातील गँगस्टर सौरभ महाकालशीही संबंधित होता. सौरभ महाकाल अनेक वेळा पंजाबमधील त्याच्या घरी येऊन राहिला होता. मुंबई पोलिसांनी बॉलीवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना पाठवलेल्या धमकीच्या पत्राबद्दल सौरभची चौकशी केली होती. पंजाबमध्ये झिशान अख्तरवर खून, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी थेट संपर्कात होता.
