विशेष प्रतिनिधी
धाराशिव : प्रकाश महाजन हा मेंटल माणूस आहे. त्याच्याशी माझी तुलना का करता? मी दिल्लीला होतो आणि तो इकडे कुठे उभा राहातो क्रांती चौकात. त्याला भेटायला मी यायचं का? अशा शब्दांत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला.
( Prakash Mahajan is a mental man Why are you comparing me with himNarayan Ranes anger)
गेल्या काही दिवसांपासून राणे कुटुंबीय आणि मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यात वाद सुरू आहे. महाराष्ट्राच्या जनतेने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकाला 20 आमदार दिले तर दुसऱ्याला शून्य आमदार दिले. आम्ही एवढे घाबरलो की आम्हाला झोप लागत नाहीये, एवढी भाजपला भिती वाटत आहे की आता आमचे कसे होणार? अशा शब्दांत नीतेश राणे यांनी राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेची खिल्ली उडवली होती. त्यावर प्रकाश महाजन यांनी टीका करणाऱ्यांनी आपल्या औकातीत रहावे. नितेश राणे यांची वैचारिक उंची ते उभे राहिले तर लवंग एव्हडी आहे अन् बसले तर विलायची येवढी होते. त्यामुळे आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही. ते त्यांच्या वैचारिक उंची आणि रुंदी प्रमाणे सल्ले देत असतात. त्यावर नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांना उद्देशून, “लायकीपेक्षा जास्त बोलत आहात, परत बोललात तर उलट्या करायला लावीन,” असा दम भरला होता. यावर उत्तर देताना महाजन म्हणाले, मी राज ठाकरे यांचा खरा कार्यकर्ता आहे. मी माझ्या घराचा पत्ता देखील सांगायला तयार आहे. मला मारहाण करून तुमच्या मनाचे समाधान होत असेल तर मारहाण करा. राज ठाकरे वरील टीकेला, त्याच शब्दांत उत्तर दिले जाईल. त्यावर नारायण राणे यांनी उत्तर दिले आहे.
महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे, अशी टिप्पणी मंत्री नितेश राणे यांनी केली होती. यावर नारायण राणे यांनी नितेश यांना समज दिली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिली आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. मी मुख्यमंत्री असताना मी सांगायचो की, मला साहेब म्हणू नका सेवक म्हणा.
कोणाचा निधी अडवणं हे चुकीचं आहे. त्याबाबतही मी सूचना देणार आहे, अशी भूमिका मांडत जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबतच्या नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर राणेंनी पडदा टाकला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत की नाही, याबद्दल मला माहिती नाही. ते एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे, असे नारायण राणे यांनी म्हणाले.
