विशेष प्रतिनिधी
पुणे : राज ठाकरे यांना यापूर्वीही आम्ही ऑफर दिली होती. आजही आमची राज ठाकरे यांना सोबत येण्यासाठी ऑफर आहे. राज ठाकरे हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक लढू शकतात. त्यांनी आमच्या सोबत यायला पाहिजे, असे निमंत्रण शिंदे गटाचे नेते आणि समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहे. ( Come with usShiv Sena Shinde group invites Raj Thackeray)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राज ठाकरेंची नक्की भूमिका काय याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी थेट राज ठाकरे यांना युतीची ऑफर दिली आहे.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? यावरही शिरसाट म्हणाले, राजकारणात यूटर्न अनेक वेळा पाहायला मिळतात. पण जोपर्यंत युती होत नाही, तोपर्यंत बोलता येत नाही. जे काही होईल ते काही दिवसात समजेलच. मात्र राजकारणात काही होऊ शकते. कोण काय बोलतो. यापेक्षा युती कुणाशी होते, कुणासोबत होते हे पाहणे महत्त्वाचे आहे. उबाठा गटाची भूमिका काय आहे हे कळत नाही, शरद पवार त्यांच्यासोबत नाही, काँग्रेस त्यांना विचारत नाही, असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
राज ठाकरे हे दरवेळी जेव्हा भेटतात तेव्हा त्यांची कामं असतात. काही सूचना असतात. पुढची राजकीय परिस्थिती काय असेल त्यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही. या भेटीवर राज ठाकरे किंवा मुख्यमंत्री हे खुलासा करतील, असेही ते म्हणाले.
