विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या AI-171 या एअर इंडिया विमानाच्या अपघाताचा व्हिडीओ सर्वप्रथम रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाला अहमदाबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करत काही माध्यमांनी फेक न्यूज दिली. सोशल मीडियावर यामुळे खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. मात्र अहमदाबाद पोलिसांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
( Fake news that a youth who shot a video of a plane crash was arrested Ahmedabad Police refutes claim)
द लल्लनटॉपचे पत्रकार अभिनव पांडे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक दावा केला की, पहिल्यांदाच शहरात आलेल्या आणि विमान पाहणाऱ्या त्या तरुणाने हा भीषण अपघात पाहिला. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने तो अधिक घाबरला. त्याचे वडील मदन हे एक निवृत्त सैनिक आहेत. त्यांनी पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पांडे यांनी झी २४ कलाक या गुजराती माध्यमाच्या एका पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्यामध्ये स्पष्टपणे “किशोराला पोलिसांनी ताब्यात घेतले” असे नमूद होते. मात्र, ही पोस्ट आता हटवण्यात आलेली आहे.या दाव्याला अहमदाबाद काँग्रेस सेवादलानेही दुजोरा दिला आणि दावा केला की, “विमान अपघाताचा व्हिडीओ शूट केल्याबद्दल संबंधित मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.”
या सर्व दाव्यांवर प्रतिक्रिया देताना अहमदाबाद पोलिसांनी ट्विटरवर अधिकृत स्पष्टीकरण दिले की, “कोणत्याही व्यक्तीला केवळ व्हिडीओ केल्याबद्दल अटक करण्यात आलेली नाही. संबंधित तरुण स्वतः त्याच्या वडिलांसह पोलीस ठाण्यात आला होता. त्याने साक्ष दिली आणि त्यानंतर वडिलांसह परत गेला. कृपया अफवा पसरवू नका.”
पोलिसांनी यासोबत हेही स्पष्ट केले की, ” मोबाइल स्क्रीन रेकॉर्डिंगमुळे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. परंतु हे करताना कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर अटक किंवा ताबा घेण्यात आलेला नाही.”
पोलिसांच्या स्पष्टीकरणानंतर अभिनव पांडे यांनी पुन्हा पोस्ट करून दावा केला की, “मी अटक किंवा ताब्यात घेतल्याचे म्हटले नव्हते, फक्त पोलिसांच्या वागणुकीबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.”
मात्र, त्यांच्या मूळ पोस्टमध्ये त्यांनी शेअर केलेल्या झी २४कलाकच्या स्क्रीनशॉटमध्ये स्पष्टपणे ‘ताब्यात घेतले’ असे लिहिले होते, त्यामुळे त्यांच्या स्पष्टीकरणात विरोधाभास आढळतो. हे स्क्रीनशॉट्स अजूनही त्यांच्या ट्विटर प्रोफाइलवर उपलब्ध होते, त्यामुळे पांडे यांचा दावा अधिकच संशयास्पद ठरत आहे.
या घटनेत पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की कोणतीही अटक किंवा ताब्यात घेण्याची कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात सोशल मीडियावर उमटलेली संतप्त प्रतिक्रिया ही अपूर्ण किंवा अप्रमाणित माहितीच्या आधारे घडलेली आहे, असे स्पष्ट होते. माध्यमांनी अशा संवेदनशील घटनांबाबत अचूक माहितीवर आधारित बातम्या द्याव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
