विशेष प्रतिनिधी
मुंबई : कधीकाळी मॉडेलिंग केलेलं, गाणीही लिहिली असे मॉडेल आणि गीतकार देवेंद्र फडणवीस मनमोकळ्या गप्पांमधून उलगडत केले आणि कठोर प्रशासक, मुत्सद्दी नेत्यामागचे त्यांचे एक वेगळेच रूप समोर आले. ( Model lyricist Devendra Fadnavis revealed through open chat)
सतत कार्यमग्न, राजकारणात व्यस्त असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असलेले आपण पाहतो. परंतु मुंबईतील पाच प्रसिद्ध रेडियो जॉकींनी त्यांची एका कार्यक्रमात मुलाखत घेतल. विशेष म्हणजे यात कुठलाही राजकीय मुद्दा नव्हता.
देवेंद्र फडणवीस मॉडेल होते. त्यांचे काही फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत. सोबतच फडणवीस हे कवी, गीतकार आहेत. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर मॉडलिंग हा अपघात होता. मित्रांनी केलेला प्रँक होता. पण नंतर मॉडेलिंगची मी कधीही हिंमत केली नाही, असे सांगताना फडणवीस म्हणाले त्यावेळी मॉडलिंग गाजली. कारण, कुत्रा माणसाला चावला तर बातमी नसते माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते.
कविता आणि गीत लिहण्याच्या आवडीविषयी ते म्हणाले, राम जन्मभूमीवेळी मी रामावर गाणं लिहिलं. शंकरावर गाण लिहिलंय. शंकर महादेवन यांनी ते गाणं गायलं आहे. तसेच मी आणखी एक गाणं लिहिलेलं आहे. पण त्याचा शोध तुम्हीच घ्या, अशी गुगलीही त्यांनी टाकली.
कवितांबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे म्हणत तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे.. अशी रामदास आठवले स्टाइलमध्ये त्यांनी काही ओळी यमक जुळवत म्हणून दाखवल्या. पुढे त्यांनी लिहिलेली एक कविताही त्यांनी म्हणून दाखवली..
पण’, ‘आणि’, ‘किंवा’, ‘परंतु’
अशा अर्थपूर्ण शब्दांचा
निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे…
कविता म्हणजे,
जी मनाला छेदून गेली पाहिजे,
हृदयाला भेदून गेली पाहिजे,
आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे…
हिंदी सिनेमातील आवडत्या गाण्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अजय देवगण आणि तब्बू यांच्या सिनेमातील गाण्याच्या ओळी म्हटल्या. गाण्यांविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गाणी आपल्यातील संवेदना जीवंत ठेवतात, आम्ही बाहेरून खडूस दिसतो पण आतून चांगले आहोत. आम्ही सर्व राजकीय व्यक्ती दररोज 10 रील्स बनवतो. त्यामुळे म्युजिक आम्हाला प्रमोट करते, असे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गाणी खूप लक्षात राहतात, पण मी सुरात गात नाही. त्यामुळे मी मोठ्याने गाणी लावतो आणि त्यात गातो. ज्यामुळे सूर चुकले तर कळत नाही. आम्ही कोरसवाले माणसं आहोत. तसेच मला अमृतावर प्रेशर टाकून तिला म्हणावे लागेल की माझे गाणे म्हण, मी एक गाणे लिहिले आहे जे अमृताने गायले आहे, ते तुम्ही शोधा, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
राहों में उनसे मुलाकात हो गई.. हे माझ्या आवडीचे गाणे
आम्ही लव्ह मॅरेजवाले नाही. मला 90 च्या दशकातील गाणी आवडतात. राहों में उनसे मुलाकात हो गई.. हे माझ्या आवडीचे गाणे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मला असे वाटते की आपल्याला जे आवडते ते केले तर आपण थकत नाही, असे सांगत त्यांनी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे उदाहरण दिले. आशाताई या वयातही 3 तास कार्यक्रम करू शकतात, तशा त्या 21 वर्षांच्या आहेत, कारान त्या गाणे जगतात. तसेच, आपल्याला आवडते ते काम करताना आम्ही देखील थकत नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपल्या आवडीचे काम करण्याचा सल्ला देखील दिला आहे.
