विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीची चर्चा असताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना चांगलेच सुनावले आहे. ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये, असे देशपांडे यांनी म्हटले आहे. ( Spoons should stay on the plate and not come out and try to feed the Sandeep Deshpande told Sanjay Raut)
संजय राऊत सध्या ठाकरे गटाने मनसेसोबत जावे अशी भूमिका हिरीरीने मांडत आहेत. त्यांना टोला मारताना देशपांडे म्हणतात, ट्रम्पपासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणारे आम्हाला सल्ले देतात की प्रश्न विचारू नका. मग आमचाही सल्ला आहे ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये.
संदीप देशपांडेंनी पुढे म्हटलंय की, जे बोलायचं आहे ते तुमचे आणि आमचे पक्ष प्रमुख बोलतील तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा.
विशेष म्हणजे सामनातील रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी आजच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लिहिले आहे. त्यामुळे देशपांडे यांचा टोला राऊत यांनाच असल्याचे स्पष्ट आहे.
दरम्यान, याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, राजकारणात माणसाने नेहमी संयमी आणि आशावादी असावं. काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. नुसता उथळपणा करून राजकारण चालत नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो, मराठी माणसाच्या न्यायी हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम ठेवावा लागतो. काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही. कोण काहीही म्हणेल येड्या गबाळ्या सारख, त्याला अर्थ नाही, अशा शब्दांत राऊत यांनी संदीप देशपांडे यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिलं आहे.
राऊत म्हणाले, मी वारंवार सांगतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते आणि भाऊ निर्णय घेतील.आज बोलत आहेत, ते राजकारणामध्ये उशिरा आले आहेत. ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबांना मी जवळून ओळखतो म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहिती नाही. त्यांच्या म्हणण्याला येथे अर्थ नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या म्हणण्याला अर्थ आहे. कोण काही म्हणेल त्याला अर्थ नाही. आमच्याकडचं कोणी काही म्हणालं नाही, त्यांच्याकडे कोण काही म्हणणार नाही.
