भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची ऐतिहासिक अंतराळभरारी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ क्षेत्रासाठी २५ जून २०२५ हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अमेरिकेतील स्पेसएक्स आणि अ‍ॅक्सिओम स्पेसच्या संयुक्त Axiom-4 (Ax-4) मोहिमेअंतर्गत अंतराळात यशस्वी उड्डाण घेतले. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत. ( Indian Air Force Group Captain Shubanshu Shuklas historic space flight)

या मोहिमेचे प्रक्षेपण अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातल्या केनेडी स्पेस सेंटर येथून करण्यात आले. शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात झेप घेतली. सुरुवातीला हे प्रक्षेपण २९ मे रोजी होणार होते, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ते लांबणीवर पडले होते. अखेर २५ जून रोजी या मोहिमेने यशस्वी उड्डाण घेतले आणि भारताच्या अंतराळ सफरीत नवा अध्याय लिहिला गेला.

Axiom-4 ही १४ दिवसांची अंतराळ मोहीम असून, तिच्यात चार सदस्यीय अंतराळवीरांची टीम सहभागी झाली आहे. शुभांशू शुक्ला यांच्यासह नासाच्या माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन या मोहिमेच्या प्रमुख आहेत. त्यांच्यासोबत पोलंडचे स्लावोस उजनास्की-विस्निवेस्की आणि हंगेरीचे तिबोर काबू हे दोन आंतरराष्ट्रीय अंतराळवीर देखील सहभागी झाले आहेत.

या मोहिमेचा उद्देश विविध वैज्ञानिक, जैववैज्ञानिक आणि अभियांत्रिक प्रयोग करणे हा आहे. अंतराळात राहून हे चारही अंतराळवीर विविध प्रयोग आणि निरीक्षणांची नोंद घेणार आहेत. शुभांशू शुक्ला या मोहिमेत पायलट म्हणून भूमिका बजावत असून, त्यांना भारतीय वायुदलातील अनुभव आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण लाभले आहे.

या मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, शुभांशू शुक्ला यांच्यामार्फत भारतीय संस्कृतीचे सादरीकरण होणार आहे. अंतराळ स्थानकावर ते भारतीय योगासने, कला, आणि परंपरांचा परिचय इतर अंतराळवीरांना देणार आहेत. त्यामुळे ही मोहीम केवळ वैज्ञानिकदृष्ट्या नव्हे, तर सांस्कृतिक राजदूत म्हणूनही भारताची ओळख जागतिक स्तरावर अधोरेखित करणार आहे.

राकेश शर्मा यांच्यानंतर शुभांशू शुक्ला हे अंतराळात झेपावणारे दुसरे भारतीय ठरले आहेत, मात्र ते ISS वर जाणारे पहिले भारतीय आहेत. त्यामुळे ही मोहीम भारताच्या वाढत्या अंतराळ क्षमतेचे आणि जागतिक सहकार्याचे प्रतीक बनली आहे.