मर्सिडीज, फॉर्महाऊस असलेल्यांना कर्जमाफी नाही; गरजूंनाच मदत, महसूल मंत्री बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका

विशेष प्रतिनिधी

अमरावती : कर्जमाफी केवळ खऱ्या गरजू शेतकऱ्यांसाठीच असेल. शेतीवर कर्ज काढून मर्सिडीज गाड्या खरेदी करणारे, फॉर्महाऊस उभारणारे किंवा जमिनींवर लेआऊट विकसित करणाऱ्यांना या योजनेंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे. ( No loan waiver for those who own Mercedes and farmhousesHelp only for the needyRevenue Minister Bawankules clear stance)

बावनकुळे अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमचे सरकार खऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पण शेतीच्या नावाखाली घेतलेले कर्ज कोणाच्या आलिशान जीवनशैलीसाठी वापरले जात असेल, तर त्यांच्यासाठी कर्जमाफी नाही.

सरकार कर्जमाफीबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असून, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या समितीची अधिकृत घोषणा होईल. याशिवाय, 3 जुलै रोजी सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत विधानभवनात मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत 8 ते 10 मंत्री सहभागी होणार असून, शेतकऱ्यांसंदर्भात ठोस निर्णय घेऊन शासन निर्णयही जारी केला जाणार आहे.

यावेळी बोलताना बावनकुळे यांनी महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या योजनांबाबतही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली 1500 रुपयांची बहिण योजना लवकरच वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे.