विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील सर्वात मोठे वाहन स्क्रॅपिंग सेंटर लवकरच एसटी महामंडळाच्या जागेवर उभारले जाणार असून हे सेंटर सार्वजनिक-खाजगी भागीदारीत उभारण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. हे स्क्रॅपिंग सेंटर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे महामंडळाच्या १०० एकर जागेवर उभारले जाणार आहे. ( The states largest scrapping center will be set up on the site of ST in Khultabad.)
या केंद्रात १५ वर्षांहून जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप केली जातील आणि त्यांच्या सुटे भागांचे पुनर्वापर न करता पर्यावरणपूरक पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावली जाईल. केंद्र शासनाने २०२१ मध्ये रजिस्टर व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी (RVSF) अंतर्गत हे धोरण तयार केले होते, जे महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये स्वीकारले. ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्डनुसार अशा स्क्रॅपिंग केंद्रांना मान्यता देण्याचे धोरण ठरवण्यात आले असून एसटी महामंडळालाही राज्यात तीन ठिकाणी अशी केंद्रे उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सरनाईक म्हणाले, “सध्या राज्यात सरकारच्या मान्यतेने ८ स्क्रॅपिंग संस्था कार्यरत असून त्यांची वार्षिक क्षमता प्रत्येकी किमान १००० वाहने स्क्रॅप करण्याची आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळातर्फे उभारले जाणारे हे स्क्रॅपिंग सेंटर सर्वाधिक वाहनांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारे ठरेल. त्यामुळे एसटीला एक वेगळा आणि शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत मिळणार आहे.”
या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत, स्क्रॅपिंग प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यबळ करार पद्धतीने भरती करणे, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढतीसाठीचे निकष ठरवणे, तसेच नवीन वाहन खरेदी धोरण यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. सरनाईक यांनी स्पष्ट केले की या प्रकल्पामुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल आणि महामंडळाच्या आधुनिकतेकडे वाटचाल होईल.
