पुणे जिल्ह्यात सुरू झाली राज्यातील पहिली गवताळ कुरण सफारी, चिंकारा, लांडगे, कोल्हे, तरस आणि गवतावरचे दुर्मिळ पक्षी पाहण्याची संधी

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात कडबनवाडी येथे महाराष्ट्रातील पहिलीच गवताळ कुरण सफारी (Pasture Safari) सुरू करण्यात आली आहे. गवताळ प्रदेशात विशेषरित्या सुसज्ज जिप्सींमधून पर्यटकांना वन्यजीव निरीक्षणाचा अनुभव घेता येणार आहे. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. ( The states first grassland safari has started in Pune districtan opportunity to see chinkarawolves foxes taras and rare birds on the grasslands)

या सफारीतून चिंकारा, लांडगे, कोल्हे, तरस यांसारख्या दुर्मिळ आणि संरक्षित वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवासात दर्शन घेता येणार आहे. याशिवाय गवताळ प्रदेशात आढळणारे विविध पक्षी, कीटक, आणि वनस्पतींचे सुद्धा बारकाईने निरीक्षण करता येणार आहे. पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातूनही या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे.

राज्यातील गवताळ भूभागाची जैवविविधता लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कडबनवाडी गवताळ प्रदेशात ‘कुरण सफारी’ हा नवा उपक्रम राबविण्यात आला आहे. राज्यातील गवताळ भूभागामध्ये अशा स्वरूपात पर्यटनवाढीचा व पर्यावरण साक्षरतेचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या उपक्रमामुळे कडबनवाडीचं नाव देशभरात पोहोचणार असल्याचा विश्वास मंत्री भरणे यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात पुणे वनविभागाकडून तीन जिप्सीधारकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला, जेणेकरून स्थानिक लोकांचे आर्थिक सबलीकरण होईल. तसेच ‘कडबनवाडी गवताळ प्रदेश’ या विशेष ब्रँडिंगचा लोगो देखील मंत्री भरणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री भरणे यांनी स्वतः गवताळ प्रदेशात जाऊन कुरण सफारीचा अनुभव घेतला. त्यांनी स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना या सफारीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. “हे केवळ पर्यटन नव्हे, तर पर्यावरण जागृती आणि स्थानिक रोजगारनिर्मितीचे एक माध्यम आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

राज्यातील इतर जंगल सफारींपेक्षा वेगळा अनुभव येथे मिळणार आहे. गवताळ परिसंस्थेतील विशिष्ट प्रजातींचं जतन करणे शक्य होणार आहे. पर्यावरण पर्यटनातून स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती शक्य होणार आहे.