सारथी संस्थेत पीएचडीसाठी एका विद्यार्थ्यावर ३० लाख खर्च! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता स्थापना करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेत (सारथी) गेल्या पाच वर्षांत एका विद्यार्थ्यावर ३० लाख खर्च झाल्याची धक्कादायक माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यामुळे बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असून या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबवण्यात येईल, असे अजित पवार यांनी आज विधान परिषदेत सांगितले. (30 lakhs spent on a student for PhD at Sarathi Institute Information from Deputy Chief Minister Ajit Pawar)

अजित पवार म्हणाले, सारथी संस्थेमध्ये २०१८ ते २०२५ या कालावधीत ८३ अभ्यासक्रमांमध्ये ३ लाख विद्यार्थ्यांना शासनामार्फत विद्यावेतन, शिष्यवृत्ती आदी लाभ देण्यात आले. त्यापैकी ३ हजार म्हणजे केवळ १ टक्का विद्यार्थ्यांनी पीएचडी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला होता. त्या एक टक्का विद्यार्थ्यांसाठी २८० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. ५ वर्षांत एका विद्यार्थ्यामागे ३० लाख रुपये खर्च झाला, ही बाब गांभीर्यानं घेण्यासारखी आहे. यापुढच्या काळात ज्या अभ्यासक्रमांच्या आधारे रोजगार मिळेल, अशाच अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये विद्यार्थी संख्या, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती यांची संख्या ठरवणं आणि गुणवत्ता वाढ यासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे. त्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.

बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रम व योजनांमध्ये एकसमानता आणण्यासाठी कायमस्वरुपी समिती गठीत करण्याचा तसेच एक सर्वंकष धोरण आखण्याचा निर्णय २०२३ सालीचा घेण्यात आला होता.