ड्रग्स विरोधात मुख्यमंत्र्यांचा एल्गार, पोलिसांचा सहभाग आढळल्यास बडतर्फ करणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या ड्रग्स (अंमली पदार्थ)विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एल्गार पुकारला आहे. या व्यवहारात पोलिसांचा सहभाग आढळल्यास बडतर्फ करण्याबरोबरच ड्रग तस्करांवर मकोका कारवाई करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. (Chief Ministers Elgar against drugs will dismiss police if found involved)

विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री ड्रग्स विरोधात कारवाईचा निर्धार व्यक्त करताना म्हणाले,
अमली पदार्थांच्या व्यवहारात पोलिसांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळल्यास कलम 311 अंतर्गत बडतर्फ करणार आहे. त्याचबरोबर अमली पदार्थविरोधी कारवाईअंतर्गत पोस्टसह सर्व कुरिअर कंपन्यांना कुरिअरची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विविध विभागांचे जॉइंट टास्कफोर्स तसेच विशेष मोहीमेअंतर्गत ‘सोशल मीडिया’ आणि ‘डार्क नेट’ वर लक्ष ठेवण्यात येणार आहे. बाहेरून येणार्‍या अमली पदार्थांवर नजर ठेवणार. यासोबतच ‘अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स’मध्ये काम करणार्‍या अधिकार्‍यांना योग्य ट्रेनिंग आणि पुढे चांगली पोस्टिंग देण्याची व्यवस्था उभारणार आहे.

सध्या अमली पदार्थांचे ग्लोरिफिकेशन होत आहे. या ‘ग्लोरीफिकेशन’ विरोधात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्ममार्फत जनजागृती केली जाणार आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर करणार्‍यांवर अत्यंत कडक कारवाई होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ज्या कंपन्यांच्या स्क्रॅप मधून अमली पदार्थ बनू शकतील, अशा कंपन्यांसाठी योग्य नियम बनवण्याच्या एफडीए आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना सूचना देण्यात येतील.

बहुचर्चित हायड्रो वीड ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी नवीन चिचकार याला ११ जून रोजी मलेशियातून अटक करण्यात आली आहे. त्याला भारतात परत आणण्यात आले आहे. आरोपी नवीन चिचकार मलेशियामध्ये लपून बसलेला आहे. ही माहिती खात्रीलायक असल्यामुळे संबंधित यंत्रणांनी त्याला तिथे अटक केली. भारतात निर्वासित म्हणून पाठवले. चिचकरचा भागीदार प्रभात पांडेला देखील अटक झाली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

नवीन चिचकर हा हायड्रो गांजाचं काम करत होता. देशातून तो पळून गेला आणि ऑस्ट्रेलियात त्याने एक बेट विकत घेतले. तो थायलंड आणि युएसमधून हायड्रो गांजा आपल्या देशात पाठवत होता. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर हे लक्षात आलं की हायड्रो गांजा पोस्टाने पाठवलं. पोस्टाचे लोक सापडले, कस्टमचे लोक सापडले. त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आपले दोन पोलीस सामील आहेत हे समजल्यावर त्यांनाही बडतर्फ केलं.

ड्रग संदर्भात पोलिसांचं धोरण हे झीरो टॉलरन्सचंच आहे. दोन इंडोनेशियन नागरिकांना पाच दिवसांपूर्वी पकडण्यात आलं. त्यांच्याकडून २१ कोटी ५५ लाख रुपये किमतीचा २१ किलो हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे. हे लोक तुरुंगात जातात, चार महिन्यांनी सुटून आल्यावर पुन्हा हाच व्यवसाय करतात हे लक्षात आलं आहे. हे लोक तुरुंगात जातात, चार महिन्यांनी सुटून आल्यावर पुन्हा हाच व्यवसाय करतात हे लक्षात आलं आहे. त्यामुळे या संदर्भातला जो कायदा आहे त्यात आपण सुधारणा या अधिवेशनात करणार आहोत. अशा प्रकारचा गुन्हा जो आहे त्या अंतर्गत मकोकाच्या अंतर्गत अटक करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. शाळा आणि महाविद्यालयांपाशी ज्या पान टपऱ्या किंवा ठेले होते आणि जिथे संशयित अशा प्रकारचा व्यवहार चालतो तिथे धाड टाकण्यात आली असं नाही तर त्यांचं अतिक्रमणही काढलं आहे.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पूर्वी पेडलर पकडले जायचे, तो पेडलर आत जायचा आणि बाहेर यायचा आता मागे नेमके कोण आहेत? ते शोधून आपण कारवाई करत आहोत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.