विशेष प्रतिनिधी
मुंबई : सामान्य नागरिकांना आरोग्यसेवा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वखाली महाराष्ट्राने भरारी घेतली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 430 खाटांचे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. (Healthcare for the common man pace of creation of new medical colleges and hospitals under the leadership of the Chief Minister)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे निर्माणाधीन वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या जागा उपलब्धता व बांधकामाच्या प्रगतीसंदर्भात आढावा बैठक झाली. राज्यातील वाशिम, भंडारा, अंबरनाथ आणि पालघर येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये प्रस्तावित आहेत. या महाविद्यालयांच्या बांधकामाकरिता जागा उपलब्ध होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने, प्राधान्याने कारवाई करावी. तसेच या जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामासाठी शासन मान्यता मिळाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने उपलब्ध जागांची पाहणी करून जागा निश्चित करावी. या कामांसाठी सल्लागार संस्था नियुक्ती तसेच अनुषंगिक बाबींची वेळेत पूर्तता होण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे. कोणत्याही कामात दिरंगाई होऊ नये याची स्थानिक प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
सिंधुदुर्ग, जालना, अमरावती, वाशिम, वर्धा, बुलढाणा, गडचिरोली, परभणी व हिंगोली येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 430 खाटांचे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. या महाविद्यालयांमध्ये आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असून, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमांनुसार सर्व कामांचा सुधारित सर्वसमावेशक प्रस्ताव उच्चस्तरीय समितीसमोर सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
