तथाकथित पुरोगाम्यांच्या विरोधानंतर महाविकास आघाडी बिथरली, जन सुरक्षा विधेयकाला आधी पाठिंबा आता विरोध!

 

विशेष प्रतिनिधी

मुंबई : तथाकथित पुरोगामी विरोधात जाऊ लागल्याने महाविकास आघाडीच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे काल विधानसभेत जन सुरक्षा विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीने आज विधान परिषदेत विरोध केला.

(After So-Called Progressives’ Outcry, MVA Rattled, U-Turn on Jan Suraksha Bill: From Support to Opposition!)

राष्ट्र विघातक डाव्या कडव्या विचारांनी तरुणाई प्रभावित होऊन ती नक्षलवादाकडे वळण्याचा धोका रोखण्यासाठी, देशाच्या संविधानाला झुगारणाऱ्या घातक नक्षल विचारांना पायबंद बसावा म्हणून महाराष्ट्र सरकारने विशेष जनसुरक्षा विधेयक आणले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुचर्चित जनसुरक्षा विधेयक गुरुवारी विधानसभेत मांडले होते. यावेळी त्यांनी संयुक्त चिकित्सा समितीचे आभार मानताना जन सुरक्षा विधेयक का महत्त्वाचे आहे, याबाबत सभागृहाला माहिती दिली होती. त्यानंतर विधानसभेत महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक एकमताने मंजूर झाले होते. मात्र कालपासून राज्यातील तथाकथित पुरोगामींनी महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका व्यक्त करायला सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात खोटा प्रचार करण्यात या मंडळींनी महाविकास आघाडीला मदत केली होती. त्यामुळे आज अचानक भूमिका बदलून विरोधकांनी विधान परिषदेत विधेयकाला विरोध केला.

लोकसभा निवडणुकीत निखिल वागळे , असीम सरोदे यांच्यासोबत निर्भय बनोच्या नावाखाली सभा घेणारे विश्वंभर चौधरी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यावरून काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला चांगलेच सुनावले.
काँग्रेस,राष्ट्रवादी (शप) आणि शिवसेना(उबाठा)यांनी एक श्वेतपत्रिका काढून लोकशाही आणि संविधान विरोधी जनसुरक्षा विधेयकाला एकमतानं का पाठिंबा दिला हे लोकांना सांगावं. संविधान फक्त मतं मिळवण्याचं मशीन वाटत असेल तुम्हाला तर लोक विरोधी पक्षाचाही नवा पर्याय उभा करतील हे विसरू नका, असा इशारा त्यांनी दिला.

तर निखिल वागळे म्हणाले माझा विश्वास बसत नाही… मार्क्सवादी आमदार ‘विनोद निकोले’ वगळता सर्व विरोधी आमदारांनी हे ‘जनसुरक्षा विधेयक’ आवाजी मतदानाने मंजूर होऊ दिलं? काय ढोंगी लोक आहेत हे, निदान सभात्याग तरी करायचा. राज्यातला विरोधी पक्ष, मार्क्सवाद्यांचा अपवाद वगळता, विकला गेलाय असं म्हटलं तर काय चुकीचं ठरेल? असा आरोप त्यांनी केला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक हे दडपशाही, असंवैधानिक, अस्पष्टपणे परिभाषित, मनमानी आणि गैरवापरासाठी प्रवृत्त आहे. दुर्दैवाने, विरोधकांकडून कोणताही निषेध न होता हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले.

या सगळ्या पुरोगामी कडून होत असलेली टीका लक्षात घेऊन तीनही पक्षांनी आपली भूमिका बदलली. मात्र या प्रश्नावर भूमिका घेताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चांगलीच गोची झाली. सभागृहात उपस्थित असलेले उद्धव ठाकरे हे जन सुरक्षा विधेयकावर आपले न मांडताच सभागृहाच्या बाहेर पडत होते. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंना अडवले आणि विचारले की, तुम्ही जनसुरक्षा विधेयकावर बोलणार नाही का? मला वाटलं तुम्ही बोलणार असाल? नीलम गोऱ्हे यांच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांनी जन सुरक्षा विधेयकावर काय बोलणार? असा प्रश्न उपस्थित करत सभागृहाच्या बाहेर पडले.

नंतर पत्रकारांशी बोलताना सभागृहात कायद्याला विरोध का केला नाही याबाबत सारवासारण करण्याची वेळ त्यांच्यावर आली. ते म्हणाले, जनसुरक्षा कायदा बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आला. सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असून त्याचा दुरूपयोग सुरू आहे. सरकारच्या कथणी आणि करणीत फरक आहे. नक्षलवाद आणि दहशतवादाचा बिमोड करायचा आहे, असं सांगतात. परंतु, जनसुरक्षा कायद्यात कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद हा शब्द नाही. कडवी डावी विचारसारणी, असा उल्लेख बिलात केला आहे. कडवे डावा हा शब्द मी पहिल्यांदा ऐकत आहे. डावा आणि उजवा, यातील फरक करण्याची आवश्यकता आहे.
शिवसेना ठाकरे गटाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी उल्लेख केल्याचा कांगावा करत सभात्याग केला.

काँग्रेसनेही कालची आपली भूमिका बदलून
जनसुरक्षा विधेयकाला विरोध केला. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे सक्षम आहेत. नव्या कायद्याची गरज का? असे विचारत जनतेच्या मनातील संभ्रम दूर करून नव्याने विधेयक आणा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी विधानसभेत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *